श्रीरामपुरात 21 वर्षीय नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या 21 वर्षाच्या नवविवाहितेने राहत्या घरातील छताला साडी बांधून आत्महत्या केली. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे काल भर दुपारी घडली.

शरयू हिचा दीड वर्षांपूर्वी टाकळीभान येथील गौरव चितळे यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. नवविवाहिता शरयु गौरव चितळे (21) ही पती व सासु- सासरे यांच्यासमवेत राहत होती. गावाचा आठवडे बाजारचा दिवस आसल्याने पती गौरव याने सकाळीच भाजीपाला आणला होता. सासरे अंडापावची गाडी चालवत आसल्याने ते घराबाहेरच होते. तर सासुही बाहेर गेलेली होती. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शरयू घरात एकटीच होती. तीने घराच्या छताच्या पंख्याला साडी बांधुन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने हाताची शिर कापण्याचा प्रयत्न केला होता, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तिला तातडीने श्रीरामपुर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी ती मयत झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच टाकळीभान दुरक्षेत्राते पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र पवार व सहाय्यक बाबा शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन सुरू होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.