
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव रोड परिसरातील पिंपळेवस्ती याठिकाणी पूर्वीच्या वादाच्या कारणावरून संभाजीनगर येथून त्यांच्या नातेवाईकांनी काठय़ा, कुऱ्हाड, तलवारींद्वारे हल्ला केला. यात दोघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव रोड परिसरातील पिंपळेवस्ती या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे पिंपळे कुटुंबीयांकडून आयोजन करण्यात आले होते. त्यादरम्यान पूर्वीच्या वादामधून वडाळा महादेव येथील बबन कमलाकर पिंपळे यांना संभाजीनगर येथील नातेवाईकांनी फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली.
पिंपळे यांच्या वस्तीवर जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना संभाजीनगर येथून दोन वाहनांमधून 24 ते 25 जणांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन महिला पुरुष तसेच लहान मुले यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. यात अनिल बबन पिंपळे तसेच राजू गंगाधर चव्हाण हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी 13 जणांवर गुन्हा दाखल केला असून, 11 जणांना अटक केली आहे.



























































