श्रीरामपुरात दुचाकीवरून घरी जाणाऱ्या युवकावर बिबटय़ाचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकीवरून घरी जाणाऱ्या युवकावर बिबटय़ाने हल्ला केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील दिघीचारी रस्त्यावर घडली आहे. संकेत सारंगधर झुराळे असे जखमी युवकाचे नाव आहे.

संकेत झुराळे हा सायंकाळी सातच्या दरम्यान राजू शिंदे यांच्याबरोबर दिघीचारी रोडने घरी जात होता. सोपान शेजुळ यांच्या नवीन विहिरीजवळील दोन कडुलिंबाच्या झाडांआडून बिबटय़ाने संकेतच्या दुचाकीवर झडप घेत त्याला जखमी केले. सुदैवाने त्याच्या मागे असणाऱ्या शिंदेच्या गाडीच्या उजेडामुळे बिबटय़ा पळून गेला. या सर्व गडबडीत गाडी चारीत जाता जाता राहिली. त्यानंतर संकेतला श्रीरामपूरच्या साखर कामगार दवाखान्यात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचारासाठी आवश्यक औषधी उपलब्ध नसल्याने त्याला नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले.

दिघीचारी रोडलगतच्या या भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबटय़ाचे दर्शन घडत असते. मात्र, गाडीवर झडप मारून जखमी करण्याची ही घटना या भागात पहिल्यांदाच घडल्याने या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने त्वरित पिंजरा लावून बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.