
नाशिक पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सहकाऱ्यांसोबत शिवबंधन बांधून त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शुभांगी पाटील म्हणाल्या की, “मी हारले नाही, तुम्ही हारु नका. आता खरी लढाई सुरू झाली आहे. मी आज शिवबंधन बांधले. मी शब्दाला पक्की असते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मला जी जबाबदारी देतील ती मी स्विकारेल. मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसाठी लढत राहील. जुन्या पेन्शनसंदर्भात मी लवकरच आंदोलन करणार आहे,”
यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले की, शुभांगी पाटील नाशिक पदवीधरमध्ये झुंझारपणे निवडणूक लढल्या. फार कमी मतांनी त्यांचा पराभव झाला. त्याला पराभव म्हणता येणार नाही. त्यांचा लढा महत्वाचा होता. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवबंधन बांधले. त्यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळणार आहे.































































