फोटोग्राफरकडून अभिनेत्रीचा छळ, पोलिसात तक्रार दाखल

सामना ऑनलाईन । मुंबई

अश्लील मेसेज करून अभिनेत्रीचा छळ केल्याप्रकरणी एका फोटोग्राफरविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. श्वेता सिन्हा असं या अभिनेत्रीचं नाव असून ती छोट्या पडद्यावरील ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत काम करते. तिने महेंदर सोनी या फोटोग्राफरविरोधात मानसिक छळ करत असल्याची तक्रार दाखल केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी श्वेताने सप्टेंबर महिन्यात महेंदरकडे एक पोर्टफोलिओ शूट केलं होतं. त्यानंतर महेंदरने नोव्हेंबर महिन्यापर्यंत तिचे फोटो दिलेच नाहीत. उलट तो तिला वेळीअवेळी अश्लील मेसेज करून त्रास देत असे, असा आरोप श्वेताने केला आहे. सुरुवातीला तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपले फोटो मागणं सुरू ठेवलं. बऱ्याच विनवण्या केल्यानंतर महेंदरने तिला एक पेनड्राईव्ह दिला आणि त्या बदल्यात श्वेताने फोटोंचा मोबदला त्याला देऊन टाकला. पण, घरी येऊन तिने पेनड्राईव्ह सुरू केला असता, त्यात वेगळ्याच मुलीचे फोटो होते. त्यामुळे संतापलेल्या श्वेताने तडक पोलिसात तक्रार केली.

दुसरीकडे, महेंदर यानेही श्वेतावर प्रत्यारोप केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, श्वेता त्याच्याकडून मोफत फोटोशूट करवून घेत होती. तिने कधीच त्याचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे तिची ही काही पहिली वेळ नव्हती. ती तिचे फोटोही घेऊन गेली नाही, असा आरोप महेंदरने केला आहे. तसंच श्वेताला अश्लील मेसेज केल्याचा आरोपही त्याने फेटाळून लावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या