
सामना प्रतिनिधी, मुंबई
आपल्या जन्मदात्या आईची निर्दयीपणे हत्या केल्याप्रकरणी गेल्या एका वर्षापासून तुरुंगात खितपत पडलेल्या सिद्धांत गणोरे या पोलीस अधिकाऱयाच्या मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा दिला. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करत न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी त्याचा जामीन अर्ज मंजूर केला. सुटका करतानाच तीन महिन्यांतून एकदा पोलीस ठाण्यात हजेरी लावावी अशी अटही न्यायालयाने सिद्धांतला घातली.
सांताक्रुझ पूर्व येथील प्रभात कॉलनीत राहणाऱ्या सिद्धांतने त्याची आई दीपाली हिची 23 मे 2017 साली चाकूने भोसकून हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. सिद्धांतचे वडील ज्ञानेश्वर गणोरे हे पोलीस अधिकारी असून सिद्धांतच्या सुटकेसाठी त्यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सत्र न्यायालयात अर्ज केला होता. सिद्धांतचे मानसिक संतूलन ढासळल्याने त्याने हे कृत्य केले. त्यामुळे त्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी त्यांनी सत्र न्यायालयाकडे केली. परंतु सिद्धांतला कोणताही मानसिक आजार नसल्याबाबतचा अहवाल जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कोर्टात सादर केल्याने सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे सिद्धांतने जामीन मिळावा म्हणून हायकोर्टात धाव घेतली.
मानसिक स्थिती ठीक नसलेले आरोपी आपली बाजू मांडण्यासाठी असमर्थ असतात. अशा आरोपींसाठी कलम 330 मध्ये तरतूद आहे. त्या आधारावर जामीन मिळावा, अशी विनंती सिद्धांतने याचिकेद्वारे केली. ती मान्य करण्यात आली.

























































