
आयडिया कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून सायबर चोरट्याने फॅशन डिझायनर असलेल्या तरूणीला सीमकार्डची केवायसी अपडेटच्या नावाखाली तब्बल 7 लाख 32 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. याप्रकरणी तरूणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
फिर्यादी तरूणी मंगलदास रस्ता परिसरातील इमारतीत राहायला असून त्यांचा फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय आहे. 30 जुलैला सायबर चोरट्याने त्यांना फोन करून आयडिया कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करीत सीमकार्ड केवायसी अपडेट करण्याचे सांगितले. नाहीतर तुमचे सीमकार्ड बंद पडेल, अशी भीती त्याने दाखविली.
त्यानंतर सायबर चोरट्याने तरूणीला लिंक पाठवून क्रेडिट आणि डेबिट कार्डची गोपनीय माहिती भरण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार तरूणीला आलेला ओटीपी घेउन सायबर चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातील विविध व्यवहाराद्वारे तब्बल 7 लाख 32 हजारांची फसवणूक केली.
याप्रकरणी तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी दिली आहे.





























































