सिंधू संस्कृतीतील लोकं गोमांस खात होते, इतिहास संशोधकांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधू संस्कृतीमध्ये लोकांची खाण्यापिण्याची पद्धती कशी होती याबाबत संशोधन करण्यात आले आहे. हे संशोधन करणाऱ्यांनी दावा केला आहे की या संस्कृतीतील लोकं गायी, म्हशी आणि बकऱ्यांचे मांस खात होते. ए.सूर्यनारायण नावाच्या संशोधकाने याबाबतचे संशोधन करून त्याबाबतचा प्रबंध प्रसिद्ध केला आहे. सूर्यनारायण हे इतिहास संशोधनामध्ये पीएचडी करत असून फ्रान्समध्ये ते पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून संशोधन करीत आहेत. सूर्यनारायण यांचा प्रबंध आर्किओलॉजिकल सायन्स नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

सिंधू संस्कृतीतील विविध पैलूंवर सातत्याने संशोधन करण्यात आले आहे. यातील बहुतांश संशोधने ही त्या काळातील शेतीबाबतची आहेत. सूर्यनारायण यांनी मात्र धान्याशिवाय त्या काळातील लोकं मांसभक्षण करायची का ? कोणत्या पशूंचे मांस खायची याबाबत संशोधन करण्याचं ठरवलं होतं. त्यांच्या संशोधनामध्ये पशूपालन करणारी मंडळी आणि सामान्य नागरिक जी भांडी वापरायचे त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं. शास्त्रोक्त पद्धतीने या भांड्यांचा अभ्यास केल्यानंतर सूर्यनारायण यांनी या भांड्यातून त्या काळातील लोकं काय खात असावीत याबाबतचे निष्कर्ष सादर केले.

उत्खननात सापडलेल्या हाडांच्या आधारे निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न

सिंधू संस्कृतीमध्ये गहू, तांदूळ, द्राक्षं, काकडी, वांगी, हळद, कापूस, तीळ यांचे उत्पादन होत होते. त्या काळात लोकांचा भर हा गाई आणि म्हशी पाळण्यावर होता. ज्या भागात सूर्यनारायण यांनी संशोधन केले त्या भागामध्ये गाई आणि म्हशींची हाडे एकूण हाडांच्या 50-60 टक्के सापडली होती. बकऱ्यांची हाडे एकूण हाडांच्या मात्र 10 टक्के मिळाली होती. यावरून अंदाज बांधण्यात आला आहे की त्या काळातील लोकं गाई आणि म्हशींचे मांस खात असावेत. खोदकामामध्ये डुकराचीही हाडे मिळाली आहेत. मात्र डुक्कराचा वापर नेमका कशासाठी होत होता याबाबत स्पष्टता येऊ शकलेली नाहीये. खोदकामामध्ये हरणाची आणि पक्ष्यांचीही हाडे मिळालेली आहे.

हरयाणातील राखीगढी भागात संशोधन

संशोधनासाठी सिंधू संस्कृतीतील एक स्थान असलेले सध्याच्या हरयाणातील राखीगढीला निवडण्यात आले होते. संशोधनामध्ये आलमगीरपूर, मसूदपूर, लोहारी राघो सारख्या भागातील भांडीही एकत्र करून तपासण्यात आली होती. या भांड्यांच्या सखोल तपासणीनंतर निष्कर्ष काढण्यात आला आहे की त्यात पशूंचे मांस खाल्ले जात होते.

भांड्यांमध्ये मांस शिजवल्याचा निष्कर्ष

संशोधनात दिसून आलं आहे रवंथ करणाऱ्या पशूचे मांस, भाज्या आणि रवंथ करणाऱ्या पशूच्या दुधापासून बनवणारे पदार्थ या भांड्यांमध्ये बनविले गेलेले होते. सिंधू संस्कृतीमध्ये शहरी आणि ग्रामीण असा फार काही फरक नव्हता. गुजरातमध्ये सापडलेल्या काही भांड्यांच्या अभ्यासानंतर दिसून आलं होतं की त्यामध्ये दुधापासून बनणारे पदार्थ तयार केले होते. सूर्यनारायण यांनी आता त्यांच्या अभ्यासाची पुढची दिशा ही संस्कृती आणि जलवायू परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये कसे बदल होत गेले याकडे वळवण्याचं ठरवलं आहे.

इसवीसन पूर्व 2600 ते इसवीसन पूर्व 1900 या काळामध्ये सिंधू संस्कृती उदयास आली आणि बहरली होती. ही संस्कृतीच्या पाऊलखुणा हिंदुस्थान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सापडताना दिसतात. सिंधू संस्कृती ही त्या काळाच्या मानाने बरीच प्रगत संस्कृती होती. हार-बांगड्या, वजन करण्यासाठी वापरले जाणारे तुकडे, वस्तु विनिमयाची पद्धत ही त्या काळातील महत्वाची वैशिष्ट्ये होती.