
तब्बल 22 वर्षांनंतर सिंधुदुर्गवासीयांचे विमानतळाचे स्वप्न साकार होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन उद्या शनिवारी दुपारी 1 वाजता होणार आहे. सिंधुदुर्गातील विमानसेवेमुळे विकासाच्या उड्डाणाला खऱया अर्थाने सुरुवात होईल. मर्यादित निमंत्रित व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा असणार आहे.
या सोहळय़ाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालक मंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील.
कडक सुरक्षा तैनात
विमानतळ उद्घाटन पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गसह मुंबई, रायगड तसेच रत्नागिरी जिह्यांतील पोलीस यंत्रणेचा कडक बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
ज्योतिरादित्य मुंबईतून मार्गदर्शन करणार
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे मुंबईतून दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.































































