कोकणात शेतीकामांना वेग, बळीराजा सुखावला

जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे शेती आणि बागायती कामांना वेग आला आहे. आता ही कामे अंतिम टप्प्यात असून, पावसाने मधूनमधून विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव आणि माजगाव परिसरात सध्या शेतकरी शेतीच्या कामांमध्ये मोठय़ा प्रमाणात व्यस्त दिसत आहेत. यावर्षी जिह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे भातशेती तसेच अन्य खरीप पिकांची लागवड वेळेत झाली असल्याचे शेतकरी सांगतात. आता ही पिके चांगली बहरली असून, अनेक ठिकाणी कापणी आणि मळणीची कामे सुरू आहेत. तर काही ठिकाणी अंतिम फवारणी आणि निंदणीसारखी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

पावसाचे प्रमाण जरी चांगले असले तरी, मधल्या काळात पावसाने दिलेली उसंत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली आहे. त्यामुळे त्यांना वेळेवर आवश्यक मशागत आणि इतर कामे पूर्ण करता आली. सध्या वातावरणात असलेला गारवा आणि मधूनमधून येणाऱया हलक्या सरींमुळे शेतीतील कामांना अनुपूलता मिळाली आहे.