Sindhudurg News – जमिनीच्या वादातून आईच्या डोक्यावर दगड मारला, वडील आणि भावावर कोयता उगारला

जमिनीच्या वादातून पोटच्या मुलाने आई-वडिलांसह सख्या भावावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कणकवली तालुक्यात घडली आहे. पोलिसांनी हल्ला करण्यापासून परावृत्त केले असता जमिनीसाठी हापापलेल्या मुलाने जन्मदातीच्या डोक्यावर मोठा दगड मारला. यात त्या गंभरी जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (9 सप्टेंबर 2025) रात्री 8 च्या सुमारास सदर घटना घडली आहे. हरकुळ बु. कावलेवाडी येथील सुरेश केशव तायशेटे (47) यांचा मुलगा मंगेश तायशेटे (47) हा कामानिमित्त पत्नी व मुलांसोबत फोंडाघाट येथे भाड्याने राहतो. मात्र, मागील दोन महिन्यांपासून त्याने नवीन घर बांधण्यासाठी वडिलांकडे जमिनीसाठी तगादा लावला होता. यावरून दोघांमध्ये वाद सुरू आहेत. याचसाठी सुरेश हे पत्नी संगीता सुरेश तायशेटे आणि मुलगा श्रेयस यांना घेऊन तहसील कार्यालयात आले होते. यावेळी मंगेशसुद्धा तहसील कार्यलायत उपस्थित होता. त्याला जमिनी देण्याबाबतचा बाँड पेपर वाचायला दिला. त्यात काही बदल करण्यास सांगितले. मात्र, मंगेशने आई-वडिलांसह भाऊ श्रेयस याला जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुकी केली. त्यामुळे सुरेश यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून मंगेशविरोधात तक्रार दिली. तक्रार दिल्याचा राग मनात ठेऊन मंगेशने पोलीस ठाण्यात जात भावाच्या गाडीतली हवाच काढली. त्यामुळे घाबरलेल्या सुरेश यांनी पोलिसांना आपल्यासह पत्नी व मुलाला घरी सोडण्याची विनंती केली. पोलिसांनी तिघांनाही घरी सोडलं. परंतु यावेळी घरी असलेला मंगेश कोयता घेऊन तिघांवर धावून गेला. पोलिसांनी त्याला रोखले असता त्याने दगड उचलून आईच्या डोक्यावर भिरकावला. यात त्या गंभीर झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सुरेश यांनी मुलगा मंगेश याच्याविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार सुनील वेंगुर्लेकर करीत आहेत.