
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूडचा स्टार सलमान खान याच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटातील गाणी गाणाऱ्या पलक मुछल या गायिकेला तिच्या एका चाहत्याने तिला भेटण्यासाठी तगादा लावला होता. तो सतत तिला फोन व मेसेज करून त्रास देखील देत होता. याप्रकरणी पलकने आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर एका व्यक्तीला अटक केली आहे. राजेश शुक्ला (३०) असे त्या व्यक्तीचे नाव असून तो बिहारचा रहिवाशी आहे.
बिहारमधील सासाराम कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेला राजेश पलकला भेटण्यासाठी तीन दिवसांपूर्वी मुंबईला आला होता. राजेशने बॉलिवूड फोन डिरेक्टरीमधूल पलकचा मोबाईल नंबर मिळवला होता. त्यानंतर त्याने पलकला फोन करून तो तिचा चाहता असल्याचे सांगत तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र पलकने त्याला भेटण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने सतत तिला वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन व मेसेज करून भेटण्याचा तगादा लावला. मात्र पलक भेटण्यास तयार होत नसल्याने त्याने तिला धमकवण्यास व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
याप्रकरणी पलकने आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी राजेश शुक्ला फोन करत असलेल्या क्रमांकाचे लोकेशन तपासले. त्या लोकेशनच्या आधारे त्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून अटक केली.
शुक्ला यांच्यावर धमकी देणे व गुन्हेगारी कारवाया करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्याने आणखी काही बॉलिवूड कलाकारांना देखील त्रास दिला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत, असे झोन ९ चे पोलीस उपायुक्त परमजित सिंग दहिया यांनी सांगितले.






























































