वृद्ध महिलेला उडवले, मदतीचा बहाणा करत कारचालक फरार

सायन येथे एक अनोखी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने वृद्ध महिलेला गाडीने उडवले. त्यानंतर महिलेच्या कुटुंबियांना फोन करुन महिला त्याच्या गाडीसमोर बुशुद्धावस्थेत पडल्याचे सांगून तिला रुग्णालयात दाखल केले. त्याने मदत केल्याचे समजून महिलेच्या कुटुंबियांनी त्याचे आभार मानले. मात्र महिलेच्या निधनाच्या पाच दिवसानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात कारचालकाचे बिंग फुटले. याप्रकरणी त्या 43 वर्षीय कारचालकाला अटक केले आहे.

पुष्पा केणी (73) मृत महिलेचे नाव आहे. 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3 च्याास सुमारास पुष्पा केणी विठ्ठल मंदिरात जाण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान केणी यांची मुलगी स्मिता हिला दुपारी 3.30च्या सुमारास पुष्पा केणी यांच्या फोनवरुन एक फोन आला. पलिकडे असलेल्या व्यक्तीने त्यांचे नाव इस्माईल अन्सारी असल्याचे सांगितले. ते म्हणाले तुमच्या आई माझ्या गाडीसमोर बेशुद्धावस्थेत पडल्या आहेत, त्यांना सायन रुग्णालयात घेऊन जात आहे. घाबरलेल्या स्मिता यांनी लगेच फोन आपला मोठा भाऊ प्रशांत केणी याला लावला. ज्याच्यासोबत तिची आई सायनला राहत होती. प्रशांत यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली, त्यावेळी त्याची आईला इमर्जन्सी वॉर्डमध्ये होती. प्रशांतने त्याच्या आईला मदत केल्याबद्दल आणि लगेच रुग्णालयात दाखल केल्याबद्दल इस्माईलचे आभार मानले. पण दुर्देवाने 11 सप्टेंबर रोजी पुष्पा यांचे निधन झाले. प्रशांतने रुग्णालयात आवश्यक औपचारिकता पूर्ण करुन आईचा मृतदेह ताब्यात घेतला.

दरम्यान 16 सप्टेंबर रोजी प्रशांत केणी यांना पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण यांचा फोन आला आणि त्यांनी त्यांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.आईच्या मृत्यूशी संबंधित माहिती द्यायची असल्याचे सांगितले. प्रशांतने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतल. त्यावेळी चव्हाण यांनी प्रशांत यांना एक सीसीटिव्ही फुटेज दाखवले. ते पाहून प्रशांत यांना धक्काच बसला. 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3.15 वाजता आयडियल हाऊस सीएचएस समोर राणी लक्ष्मीबाई चौक बस स्टॉपजवळ असलेल्या कॅमेऱ्यातून रेकॉर्ड केलेले सीसीटीव्ही फुटेज सादर केले. ज्यामध्ये प्रशांतची आई रस्ता ओलांडत असताना मदत करणाऱ्या इस्माईलची पांढरी टोयोटा कार तिच्यावर धडकली. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे प्रशांत केणी यांनी फिर्याद दिली आणि त्यानंतर इस्माईलविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.

चव्हाण यांनी सांगितले की, त्यांच्या अधिकाऱ्याला इस्माईलबाबत संशय वाटला. म्हणून त्यांनी तपास केला आणि सीसीटीव्ही रेकॉर्डिंग शोधून काढले. ज्यात पुष्पा केणी यांना वाहनाची धडक बसल्याचे निष्पन्न झाले. त्या बेशुद्ध पडल्या नव्हत्या. तर वरिष्ठ पोलीस निरिक्षक मनीषा शिर्के यांनी स्पष्ट केले की, आम्ही कुटुंबीयांना माहिती दिली आणि त्याच्यावर आरोप दाखल केले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली पण नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.