
पालिकेच्या एम पूर्व विभाग हद्दीत शीव-पनवेल महामार्गावर, मानखुर्द जंक्शन ते वाशी टोल नाका या परिसरात स्वच्छता कामांमध्ये कुचराई केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारास दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच त्याला कारणे दाखवा नोटीसदेखील बजावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या भागात अनधिकृतपणे राडाराडा (डेब्रिज) टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात पोलीस स्थानकात तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी या परिसरात स्वच्छतेच्या अनुषंगाने केलेल्या पाहणी दौऱ्याप्रसंगी सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने ही कार्यवाही केली आहे. दरम्यान, डॉ. शिंदे यांच्या निर्देशानुसार या परिसरात मनुष्यबळ आणि संयंत्र नेमून तत्काळ स्वच्छता करण्यात आली आहे.
स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी महानगरपालिकेकडून प्रत्येक परिमंडळातील एका वॉर्ड याप्रमाणे सर्व चोवीस विभागांमध्ये, टप्प्याटप्प्याने, व्यापक स्तरावर संपूर्ण डीप क्लिनिंग ड्राइव्ह राबविण्यात येत आहे. यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर स्वच्छता अभियान सुरू आहे. कार्यवाहीअंतर्गत शिंदे यांच्या निर्देशानुसार संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 3 यांत्रिकी झाडू, 25 कामगार, 1 जेसीबी मशीन, 1 बॉबक@ट मशीन, 2 डंपर लावून हा परिसर कचरामुक्त करण्यास सुरुवात केली. या परिसरातून आज 5 डंपर अनधिकृत राडारोडा उचलण्यात आला.
उपआयुक्त, सहाय्यक आयुक्तांची सुट्टी रद्द
आज अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी मानखुर्द परिसरात भेट दिली. यावेळी त्यांना मानखुर्द टी जंक्शन ते वाशी टोलनाका या परिसरात मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. याबाबत डॉ. शिंदे यांनी उपायुक्त (परिमंडळ 5) हर्षद काळे आणि सहाय्यक आयुक्त (एम पूर्व) अलका ससाने यांच्या माध्यमातून एम पूर्व विभागाचे सहाय्यक अभियंता यांची सुट्टी त्वरित रद्द करून सदर परिसर कचरामुक्त करण्याचे आदेश दिले.

























































