
मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुढील आठवडय़ात 10 मे रोजी सहा तासांचा ‘ब्लॉक’ घेतला जाणार आहे. या दिवशी विमानतळावरील दोन्ही धावपट्टय़ा सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहतील. त्यानंतर येथील विमानसेवा पूर्ववत सुरू होईल. विमानतळ प्राधिकरणाने सोमवारी ही माहिती दिली.
मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतरचे दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ आहे. विमान वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन विमानतळ प्राधिकरणातर्फे पावसाळ्यापूर्वी देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली जातात. यावर्षी येत्या 10 मे रोजी सहा तासांचा विशेष ब्लॉक घेऊन ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. या काळात विमानतळावरील आरडब्ल्यूवाय 14/32 आणि 09/27 या दोन्ही धावपट्टय़ांवरील विमानसेवा बंद ठेवली जाणार आहे. यादिवशीची सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंतची सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. त्यानुसार प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन विमानतळ प्राधिकरणाने केले आहे.

























































