
पुणे शहरातील मध्यवर्ती फडके हाउस परिसरातील श्री सिद्धनाथ हॉल मार्किंग सेंटरमधून चोरट्याने काउंटरवरील 6 लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना 5 नोव्हेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी रोमीत सांडभोर यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोमीत श्री सिद्धनाथ हॉल मार्किंग नोंदणीमध्ये कामाला आहेत. 5 नोव्हेंबर रोजी ते काम करीत असताना एका व्यक्तीने दुकानात येउन त्यांना मोठा कागद दाखविला. त्यावर काही देणगीदारांनी रक्कम दिल्याचे दाखवून त्याने रोमीत यांना देणगीची विनंती केली.
त्यानंतर हातचलाखीने चोरट्याने काउंटरवरील 6 लाख रुपयांचे दागिने असलेली पिशवी चोरून नेली. दिवाळीमुळे रोमीत यांना दागिन्यांवरील हॉलमार्कची कामे जास्त असल्यामुळे त्यांनी उशीरा तक्रार दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील तपास करीत आहेत.































































