धक्कादायक… कल्याणमध्ये अवघ्या महिनाभरात सहा अल्पवयीन मुली बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या महिनाभरात कल्याणमधून सहा अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेपत्ता झालेल्या सर्व मुली दहावी आणि बारावीत शिकणाऱ्या आहेत. बेपत्ता मुलींचा खडकपाडा पोलीस शोध घेत असून त्यासाठी विशेष पथकेही स्थापन केली आहेत.

वाडेघर परिसरात राहणारे गोविंद निंबळे हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांची बारावीत शिकणारी १७ वर्षीय मुलगी मैत्रिणीकडे जाते असे सांगून घराबाहेर पडली. मात्र रात्र झाली तरी ती परत आली नाही. शिवाय तिचा मोबाईलही बंद होता. पालकांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र कुठेच थांगपत्ता लागला नाही. अखेर वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत भवानीनगर, प्रेम ऑटो परिसरात राहणाऱ्या सुनील सिंग यांची अल्पवयीन मुलगी महिन्यापासून बेपत्ता आहे. रामबाग येथील हिंदी शाळेत शिकणारी ही मुलगी २६ जानेवारी रोजी झेंडावंदनासाठी जाते असे सांगून सकाळी ७ वाजता घरातून निघाली. मात्र ती अजूनपर्यंत घरी परतली नाही.

  • वायलेनगर भागातील योगेशचंद्र तिवारी यांची कॉलेजला गेलेली मुलगी घरी परतलीच नाही.
  • अटाळी परिसरात भंगार विक्री करणाऱ्या महिलेची अल्पवयीन मुलगी स्वच्छतागृहात जाते असे सांगून गेली ती अजूनही घरी आली नाही. बारावे गावातून दोन, तर वाडेघर भागातून एक अशा तीन मुली बेपत्ता झाल्या.