
सामना प्रतिनिधी । नगर
रोजगार हमी योजनेवर काही ठिकाणी मजुर मिळायला तयार नसताना मोठी अडचण निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे आज रोजगार हमी योजनेच्या कामावर 6500 मजुर काम करीत आहे, भविष्यात मजुरांची संख्या वाढण्यासाठी त्या प्रमाणात कामे सुध्दा उपलब्ध करु द्यावी लागणार आहे. आज सर्वाधिक मजुर हे पारनेर तालुक्यात कार्यरत आहेत.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबवताना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने आज विविध योजनेतील कामे मजुरांमार्पत केली जात आहे. काही ठिकाणी मजुरांची संख्या कमी आहे. तर काही ठिकाणी आजही मजुर उपलब्ध होऊ शकत नाही, असे अवस्था काही तालुक्यात पाहिला मिळत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील नगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात पुन्हा मंजुरांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने तयारी केली आहे.
दुष्काळाच्या परिस्थितीत गरज असेल त्या प्रत्येकाला रोजगार पुरविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणार्या प्रत्येक मजुरास प्रती दिवस दोनशे सहा रुपये मजुरी देण्यात येते. काम संपल्यानंतर 15 दिवसांच्या आतमध्ये संबंधित मजुराचा पगार त्याच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्यात येतो. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायतींची 872 कामे सुरू आहेत. येथे पाच हजार 512 लोकांना रोजगार देण्यात आला आहे. इतर यंत्रणांची 344 कामे सुरू असून, तेथे पाच हजार 34 जणांना रोजगार देण्यात आला आहे. मागील महिन्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असणार्या कामांवर असणार्या मंजुरांची संख्या 17 हजारांपर्यंत गेली होती. मात्र, लोकसभा निवडणूक व लग्नसराईमुळे ही संख्या झपाट्याने कमी झाली.






























































