
किरकोळ कारणावरून दोन गटातील वादावादीतून 8-10 जणांच्या टोळक्याने येरवड्यातील फुलेनगरमध्ये आरडाओरडा करीत धुमाकूळ घातला. त्यानंतर तरुणावर वार करून 6 वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फुलेनगरमधील घरोंदा सोसायटी गार्डनजवळील रस्त्यावर घडली. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विनीत भालेराव (20, रा. फुलेनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनीत आणि टोळक्यातील ८ ते १० जण परिसरातील रहिवाशी आहेत. त्यांच्यात काही दिवसांपासून हद्दीत ये-जा करण्यावरून वाद सुरू होते. त्याचा राग आल्यामुळे काल रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास टोळक्याने परिसरात येउन आरडा-ओरडा केला. त्यानंतर टोळक्यातील एकाने विनीतवर वार करून जखमी केले. त्याशिवाय जाताना रस्त्यावरील 6 वाहनांची तोडफोड केली.
याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. अशी माहिती येरवडा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे यांनी दिली आहे.





























































