यंदा मान्सून समाधानकारक; स्कायमेटने वर्तवला अंदाज

देशात यंदा दरवर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज ‘स्कायमेट’ या हवामानविषयक वेबसाईटने वर्तविला आहे. साधारण 1 जूनपासून देशात मान्सून दाखल होईल, अशी शक्यतादेखील यावेळी वर्तविण्यात आली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा हिंदुस्थानात जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत सरासरी 907 मिलीमीटर इतका पाऊस पडेल, असा अंदाज मंगळवारी ‘स्कायमेट’ने वर्तविला आहे.

देशात दरवर्षी मान्सूनच्या चार महिन्यांत सरासरी 880.6 मिलीमीटर पाऊस पडतो. याला लाँग पीरियड अॅव्हरेज असे बोलले जाते. यानुसारच सर्व अंदाज वर्तविण्यात येतात. त्यानुसार ‘स्कायमेट’ने वरील अंदाज वर्तविला असल्याचे कळते. यंदा देशात साधारण 907 मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून 2021 ला 103 टक्के पाऊस पडेल, असा अंदाजदेखील यावेळी वर्तविण्यात आला आहे. 96 ते 104 टक्के दरम्यानचा पाऊस हा समाधानकारक पाऊस मानला जातो. 2019 ला हा आकडा 110 टक्के तर 2020 ला आकडा 109 टक्के इतका वर्तविण्यात आला होता. त्यानंतर आता सलग तिसऱया वर्षी समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

कर्नाटकात कमी पावसाची शक्यता

स्कायमेटने दर्शविलेल्या अंदाजानुसार जून महिन्यात बिहार आणि पश्चिम बंगाल येथे चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर जुलैमध्ये महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर कर्नाटकमध्ये दरवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडेल, असे यावेळी सांगण्यात आले आहे.

शेतकऱयांना दिलासा

दरम्यान, यंदा देशात समाधानकारक पाऊस पडणार असल्याने शेतकऱयांना त्याचा फायदा होईल, असे बोलले जात आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात रब्बी पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात झाले होते. 2020 मध्ये जवळपास 348 हेक्टर जागेवर रब्बी पिकांचे उत्पादन घेण्यात आले होते. तर तत्पूर्वी हे प्रमाण 334 हेक्टर इतके होते.

स्कायमेटने दर्शविलेले अंदाज

  • जून 177 मिलीमीटर
  • जुलै 277 मिलीमीटर
  • ऑगस्ट 258 मिलीमीटर
  • सप्टेंबर 197 मिलीमीटर
आपली प्रतिक्रिया द्या