
हत्येच्या गंभीर गुन्ह्याच्या तपासातही गांभीर्य न दाखवणारे पोलीस आणि सरकारी पक्षावर सत्र न्यायालयाने कडक ताशेरे ओढले. मागील पाच वर्षांपासून हत्येचा खटला प्रलंबित आहे. एकीकडे पोलिसांच्या तपासात विविध त्रुटी असताना खटलादेखील गोगलगायीच्या गतीने सुरू आहे, अशा स्पष्ट शब्दांत ताशेरे ओढत न्यायालयाने वाकोला येथील हत्येच्या प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर केला.
वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत 21 जून 2019 रोजी सुरेश हळदे या व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी आरोपी संदीप चौरसियाविरोधात गुन्हा नोंद केला होता. तेव्हापासून चौरासिया हा आर्थर रोड तुरुंगात आहे. त्याने ऍड. मंगेश सौंदाळकर यांच्यामार्फत जामिनासाठी सत्र न्यायालयात दाद मागितली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित लुलकर यांनी तपासातील त्रुटींवर बोट ठेवत चौरासियाला जामीन मंजूर केला. पोलिसांनी खटल्याच्या सुरुवातीला शवविच्छेदन अहवाल न्यायालयात सादर केला नाही. किंबहुना, गुह्यात वापरलेला मुद्देमाल पोलीस ठाण्यातून गहाळ झाला व नंतर तो मिळाल्याचे दाखवण्यात आले. तसेच अद्याप महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आलेली नाही. खटला गोगलगायीच्या गतीने चालत आहे, अशी निरीक्षणे न्यायालयाने नोंदवली आणि आरोपीला 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले.



























































