छोटीशी गोष्ट – दौत आणि टाक

>>स्नेहल महाबळ

प्रिय दोस्तांनो, नमस्कार! पत्रास कारण की, आपली आता भेट होत नाही. तुम्ही मला ओळखत नाही. मी माझी ओळख सांगणारच आहे. कदाचित मी आधी तुमच्या कल्पनेत तयार झालो, आणि मग प्रत्यक्षात. त्याचं काय आहे, तुमचे पूर्वज आधी फक्त बोलायचे. बोलून एकमेकांना गोष्टी सांगायचे. सगळं ज्ञान, माहिती, गोष्ट हे मुखोद्गत असायचं त्यांना. निरोप, आज्ञा अशी सगळी देवाणघेवाण, पण तोंडी. पुढे मग कधी चित्रलिपी आली. दगडावर काही रेखाटले गेले आणि माणूस लिहिता झाला. मग अक्षरलिपी आली. कालौघात साधनं बदलली, माध्यमं बदलली; पण तुमचं लिखाण अजूनही चालू आहे. दगड, भुर्जपत्र, अगदी कापड या सगळय़ांपासून सुरुवात करून तुम्ही कागदापर्यंत आलात तेव्हाच मी तुमच्या मदतीला आलो. माझ्या मदतीने तुम्ही कागदावर काही रेघोटय़ा… नाही नाही, अक्षरच लिहिता.

कोणे एकेकाळी मी आत्तासारखा नव्हतो. माझे सगळे भाग विखुरलेले होते. थाट मात्र भारी होता तेव्हा माझा. एक छान मोठं लाकडाचे, बसल्यावर हाताच्या उंचीचं असं मेज. त्यात एका डब्यात काळय़ा, निळय़ा क्वचित हिरव्याही रंगाचा असा वनस्पतींपासून बनवलेला द्रवपदार्थ असायचा. तो माझा एक भाग. ही दौत. दुसरा भाग म्हणजे एक टोकदार अशी कोणतीही वस्तू. पक्ष्याचे पीस किंवा अगदी साळिंदराचा काटाही. हे दौतीत बुडवून मग लिहिले जाई. तो द्रवपदार्थ वाळायचा नाही लवकर, मग अक्षर बिघडू नये म्हणून त्यावर बारीक वाळू टाकायची. दौत आणि टोकदार वस्तूबरोबर ही वाळलेली वाळूसुद्धा झटकून एकत्र करून परत वापरायची. पुन्हा पुन्हा… मग पुढे पक्ष्यांच्या पिसांऐवजी लाकडी दांडा आणि त्यावर धातूचा टोकदार भाग तासून बसवलेला म्हणजेच नीब हे आले. पुढे दौत फार बदलली नाही, पण आतला द्रवपदार्थ रासायनिक झाला. हे माझं आत्ता दिसणाऱया रूपाशी सुसंगत रूप. मी असा होतो तेव्हा मला सांभाळून वापरायला लागायचं, पण परत परत उपयोगी यायचो तुमच्या.

आणि मग पुढे कधीतरी ही दौत आणि टाक एकत्र झाले आणि शाईचं फाऊंटन पेन तयार झालं. हाच मी, जो आत्ता तुम्हाला पत्र लिहितोय. शाईचं फाऊंटन पेन….! तुम्ही कदाचित नाही भेटलात मला कधी. आता माझे नवे भाऊबंद येत आहेत तुम्हाला भेटायला. आमच्यावेळी मी तुमच्यासारख्या मुलांच्या हातात, ती दुसरी- तिसरीत गेली की जायचो. शिसपेन्सिलच्या ऐवजी मी, एकप्रकारे मोठेपणाची खूण घेऊनच पंपासपेटीमध्ये जायचो. बहुतेक निळय़ा शाईमध्ये लिहायचो. शाईने तसं माझं कधी ऐकलंच नाही. वहीच्या पानावर तर पसरायचीच, पण मुलांच्या कपडय़ावर, खिशाच्या तळाशी सगळीकडे ती बिनधास्त धावायची. अगदी शहाणी असली तरी मुलांच्या मधल्या बोटावर तरी नक्की. कधी कधी धक्काबुक्कीत माझं नाक मोडायचं. मग ते निब तेवढंच बदललं जायचं. मी तसाच राहायचो. कधी कधी पंटाळायचो. अगदी चिडायचोच. नाही म्हणजे नाही लिहायचो काही. मग मुलं माझे लाड करायची. मला पाण्यात बुडवून ठेवायची. अगदी स्वच्छ चकचकीत असा होऊन बाहेर यायचो. पुन्हा वापरायला तयार….! शालेय जीवनात माझ्याशी जुळलेली ही गट्टी काहींची खूप खूप वर्षे टिकायची. मग आम्हाला त्यांचीच ओळखही मिळायची. अमक्या तमक्याचं पेन अशी. अगदी एखादा वारसा पुढच्या पिढीकडे द्यावा तसा मीही पुढे दिला जायचो. ‘हे माझं, मी आत्तापर्यंत वापरलेलं पेन. तू अमुक तमुक परीक्षा पास झालीस, म्हणून माझ्यातर्फे तुला भेट’ अशा वाक्याने बऱयाचदा ही देवाणघेवाण व्हायची. घेणारे अगदी मी जणू वापरलेल्या सर्व हाताचा शहाणपणा घेऊन त्याला मदत करणार आहे, अशा भाबडय़ा भावाने मला जवळ ठेवायचे. छान वाटायचं. काहीही का असेना, खूप वर्षे काम देत राहायचो. अजूनही देईन. कपाटातून बाहेर काढून तर बघा…!
[email protected]