
हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री स्मिता जयकर सध्या काय करतात ? असा अनेकांना प्रश्न पडणं स्वाभाविक आहेत. गोड स्वभावाच्या स्मिता जयकर या बऱ्याच दिवसांपासून मालिका किंवा चित्रपटांमध्ये दिसल्या नाहीयेत. त्या सध्या काय करतात याचं उत्तर त्यांनीच दिलं आहे. त्यांनी हे उत्तर देताना जे सांगितलं ते ऐकून तुमचाही भीतीने थरकाप उडण्याची शक्यता आहे.
स्मिता जयकर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की त्यांना आत्मे दिसतात आणि त्यांच्या वेदनाही त्यांना जाणवतात. मृत आत्म्यांशी त्या संवाद साधण्याचे काम सध्या करत असून यातले काही अनुभव त्यांनी सांगितले आहे. त्यांनी म्हटले की एका कुटुंबाला एका आत्म्याशी संवाद साधायचा होता. त्या व्यक्तीविषयी मला काही कल्पना नव्हती. मला फार गुदमरल्यासारखे वाटत होते. मला सगळीकडे धुराचा वास येत होता. मला श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यातच मी खोकत होते. यानंतर स्मिता जयकर यांना कळाले की ज्या आत्म्याशी त्या संपर्क साधत होता त्या व्यक्तीचा मृत्यू धुरात गुदमरून किंवा आगीमुळे झाला होता. त्यांना नंतर कळले ती व्यक्ती जिथे काम करत होती त्या फॅक्टरीला आग लागली होती, त्यात त्याचा मृत्यू झाला होता.
स्मिता जयकर यांनी आणखी एक अनुभव सांगितला ज्यात त्यांनी सांगितले की, “एकदा एक महिला माझ्याकडे आली होती. तिचा नवरा आर्किटेक्ट होता. मी त्या महिलेच्या नवऱ्याच्या आत्म्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्या शरीरात प्रचंड वेदना होऊ लागल्या. माझे सांधे फार दुखायला लागले. मला फार वेदना होत होत्या” स्मिता जयकर यांना नंतर कळाले की त्या व्यक्तीचा मृत्यू 20 व्य़ा मजल्यावरुन पडल्याने झाला होता. त्या वेदना त्यांना आत्म्याशी संपर्क साधतेवेळी देखील होत होत्या. स्मिता जयकर म्हणाल्या की, एखादी महिला तिच्या नवऱ्याआधी गेली असेल तर ते मला दिसते. एवढेच नाही तर तिने नेमकी कोणत्या रंगाची साडी नेसली आहे तेही मला दिसते. तसेच त्या महिलेच्या जोडव्यांवरुनही मी ओळखू शकते.
स्मिता जयकर यांनी या प्रक्रियेबाबत बोलताना म्हटले की हिलिंग प्रोसेससाठी त्या आत्म्यांशी संपर्क साधत असतात. जे आत्मे दु:खी आहेत त्यांचे दु:ख संपावे त्यांना मुक्ती मिळावी ते कुठल्याही विवंचनेत, कष्टात अडकून राहू नयेत यासाठी ऑटोमॅटीक रायटींग पद्धती वापरली जाते. हिलिंग प्रोसेस हा त्याचाच एक भाग आहे. रोजच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह स्मिता जयकर या सध्या ऑटोमॅटीक रायटींगमध्ये व्यस्त असतात.





























































