बिळ समजून महिलेच्या तोंडात शिरला साप, ‘अशा’ पद्धतीने बाहेर काढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकदा गाढ झोपेत कित्येकांचं तोंड उघडं राहतं. पण, एरवी साधीशी वाटणारी ही गोष्ट एका महिलेच्या जवळपास जिवावर बेतली आहे. महिलेच्या उघड्या तोंडाला बिळ समजून त्यात साप शिरल्याची घटना घडली आहे.

ही घटना रशियातील एका महिलेसोबत घडली. रशियातील दागेस्तान इथल्या लेवाशी नावाच्या गावात ही महिला राहते. तिच्या घराबाहेर एक बगिचा आहे. घटना घडली त्या दिवशी ती आपल्या बगिच्यातच झोपली होती. झोपल्यानंतर तिचं तोंड उघडं राहिलं. त्यामुळे त्या उघड्या तोंडाला बिळ समजून साप तिच्या तोंडात शिरला. महिलेला जाग येईपर्यंत तो तिच्या पोटात शिरला होता. पण, तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, म्हणून तिने ताबडतोब रुग्णालय गाठलं.

रुग्णालयात तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिला भूल दिली. त्यानंतर तिच्या गळ्यात व्हिडीओ कॅमेरा असलेली मेडिकल ट्यूब घालून साप नेमका कुठे आहे ते शोधायला सुरुवात केली. तिच्या पोटात असलेल्या सापाला या ट्युबनेच पकडलं. मग हळूहळू त्या ट्युबच्या साहाय्याने त्याला बाहेर काढायला सुरुवात केली. साप बाहेर येत असताना रुग्णालय कर्मचारीही धास्तावले. हळूहळू तो साप बाहेर काढण्यात आला तेव्हा तो चांगला चार फूट इतका लांब असल्याचं दिसलं. डॉक्टरांनी तो संपूर्णपणे बाहेर काढला आणि एका बादलीत ठेवला.

महिलेची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र, या प्रसंगाचं वृत्त प्रसारित होताच तिच्या गावच्या अन्य काही जणांनीही आपल्या शरीरात काहीतरी जिवंत प्राणी फिरत असावा अशी तक्रार केली आहे. ते पाहून गावच्या प्रशसानाने गावकऱ्यांना घरच्या बगिच्यात झोपणं टाळायचं आवाहन केलं आहे.