बार्शीच्या फटेचा ‘विशाल’ स्कॅम, पोलीस, पत्रकार, नेतेही फसले; वडील, भावाला अटक; 60 तक्रारी दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीन महिन्यांत दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून बार्शीकरांना किमान 200 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱया विशाल फटेचा स्कॅम ‘विशाल’ असल्याचे उघडकीस आले आहे. विशालच्या या आमिषाला पोलीस, पत्रकार, डॉक्टरांसह राजकीय नेतेही फसले आहेत. विशाल फरार असून, पोलिसांनी त्याचे वडील आणि भावाला आज सांगोल्यातून अटक केली आहे.

‘शेअरबाजारात पैसे गुंतवा आणि मी ते पैसे तीन महिन्यात दुप्पट करून देतो’, असे आमिष विशाल फटे याने दाखविले. शेअर ब्रोकर असलेल्या विशालने दोन वर्षांपूर्वी बार्शीत अलका शेअर्स सर्व्हीस, विशालका कन्सलंट, पह्ग्स ट्रेडिंग पंपनी या तीन पंपन्या सुरू केल्या होत्या. बार्शी आणि परिसरातील बडे व्यापारी, डॉक्टर्स, राजकीय नेते हे त्याच्या जाळय़ात फसल्याचे दोन दिवसांपूर्वी उघड झाले. तब्बल 200 कोटी रुपयांचा घोटाळा करून विशाल, त्याची पत्नी राधिका फटे आणि दीड वर्षांच्या मुलीसह फरार झाला आहे. आतापर्यंत त्याच्याविरोधात फसवणुकीच्या 60 पेक्षा जास्त तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

तपासासाठी एसआयटी स्थापन

विशालच्या शोधाकरिता 8 पोलीस पथक रवाना करण्यात आले आहेत. या तपासाकरिता एसआयटी स्थापन करण्यात आली असून, ज्याची फसवणूक झाली आहे त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन बार्शीचे पोलीस निरीक्षक शेळके यांनी केले आहे.

विशालला पाब्लो एस्कोबार बनायचे होते

बार्शीकरांना ठगविणारा विशाल फटे याचा गुन्हेगारी जगातील कुख्यात पाब्लो एमिलियो एस्कोबार व्हायचे होते. एस्कोबार हा अवैध धंद्यातून पुढे आलेला ठग गुन्हेगारी जगतातील मास्टर माईंड होता. हा फटे पाब्लोचा आदर्श घेऊन वाटचाल करायचा मनसुबा मित्रामध्ये बोलून दाखवायचा. ही घटना उघडकीस आल्यानंतर फटेची तुलना पाब्लोबरोबर करण्यात येत आहे.