
भाजपची साथ सोडल्याच्या रागातून नगरसेवक सुनील कामाठीसह सातजणांनी कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय काशिनाथ अडगळे (रा. भगवाननगर, सोलापूर) असे जखमी कार्यकर्त्याचे नाव आहे. सुनील कामाठी, गणेश कामाठी, शिवा कामाठी, आकाश कामाठी, आकाश चव्हाण, महेश पवार, मनोज बनसोडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
संजय अडगळे हा पूर्वी भाजपचा नगरसेवक सुनील कामाठीबरोबर फिरायचा. काही दिवसांपासून तो संदीप वाडेकर या तरुणाबरोबर फिरत होता. याचा राग मनात धरून नगरसेवक सुनील कामाठी व त्यांचे समर्थक चिडून होते.
दरम्यान, संजय याचा मित्र राम जाधव याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुरारजी पेठ येथे आला असता त्या ठिकाणी नगरसेवक सुनील कामाठी, गणेश कामाठी, शिवा कामाठी, आकाश कामाठी, आकाश चव्हाण, महेश पवार, मनोज बनसोडे यांनी ‘तू कामाठी यांना सोडून दुसऱया पार्टीत गेला का?’ असे म्हणत दमबाजी सुरू केली. भीतीने संजय हा रिक्षात बसून घराकडे पळून गेला. रात्री मित्र संदीप वाडेकरबरोबर बोलत थांबलेला असताना सुनील कामाठी व त्याच्या साथीदारांनी रॉड, काठी व फरशीने बेदम मारहाण करून जखमी केले. सुनील कामाठी याने तलवारीचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात कामाठीसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चिंता किंदी तपास करीत आहेत.






























































