
कोरोनाला रोखण्यासाठी येत्या 1 मे म्हणजे महाराष्ट्रदिनापासून तिसऱया टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार असून, या टप्प्यात जिल्ह्यातील 31 लाख लोकांना लस दिली जाणार आहे.
तिसऱया टप्प्यात 18 वर्षांपुढील व्यक्तींना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, त्याची अंमलबजावणी राज्यात होणार आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात वैद्यकीय व्यवसायातील व्यक्ती, तसेच आघाडीवरचे कर्मचारी यांना लस देण्यात आली होती, तर दुसऱया टप्प्यात 60 वर्षांवरील व्यक्ती आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींचे लसीकरण झाले. त्यानंतर 45 वर्षांपुढील व्यक्तींनाही कोरोना लस देण्यात येत आहे. 11 ते 14 एप्रिल या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्यासाठी ‘लस उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले होते. टंचाई असल्याने या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम सुरू आहे. काही दिवसांपासून लसींचा तुटवडा असल्याने लसीकरण मोहीम थंडावली आहे. शहरातील आरोग्य केंद्रांवर लोकांनी रांगा लावूनही त्यांना लस मिळाली नाही. महापालिकेने पाठपुरावा केला; परंतु दोन दिवस लसींचा पुरवठा झाला नाही. काही खासगी रुग्णालयांत लसीकरण झाले; परंतु त्याचे प्रमाण कमी होते. लोकांनी लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रांवर येण्याचे आवाहन महापालिकेने केले.
शहरातील अनेक लोकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना दुसरा डोस घेण्यासाठी सहा आठवडय़ांचा अवधी देण्यात आला आहे. हा डोस घेण्यासाठी अनेकांनी महापालिकेकडे संपर्क साधला; परंतु त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. अशा टंचाईकाळात लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरूच होत आहे. त्याची प्राथमिक तयारी प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यात 46 लाख 65 हजारांपेक्षा अधिक लाभार्थी आहेत. त्यांपैकी जवळपास 31 लाख लोकांना लस देण्यात येईल, असे सांगण्यात आले.
सोलापूरला पुण्यातून लसींचा पुरवठा होतो. पूर्वी दररोज तीन हजार लसींचा पुरवठा होत होता. आरोग्य केंद्रावर लोकांना लस घेण्यासाठी जबदस्ती करावी लागत होती. आता कोरोनाचा मृत्यूदर वाढल्याने लोकांमध्ये जागृती झाली आहे. लस घेणाऱया लोकांची संख्या वाढली; परंतु लसींचा पुरवठा वाढला नाही. त्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. दोन दिवसांत ती पूर्ववत होईल.– धनराज पांडे, उपायुक्त
लसींचा जसा पुरवठा होतो, त्याप्रमाणे लोकांना ती दिली जाते. वरून पुरवठाच बंद झाल्यामुळे आमचाही नाइलाज झाला. लोकांची गैरसोय झाली हे खरे आहे. लसींचा पुरवठा झाला की नेहमीप्रमाणे लोकांना डोस देण्यात येईल. पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्यांनी चार ते सहा आठवडय़ांच्या दरम्यान कधीही दुसरा डोस घ्यावा.– संस्कृती वळवंगकर, वैद्यकीय अधिकारी




























































