उड्डाणपूल भूसंपादन कामाला एप्रिलअखेरची डेडलाइन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते पत्रकार भवन या फेज एकमधील उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण 102 खासगी मिळकतींपैकी 73 मिळकतींच्या निवाडय़ाला जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता मिळाली आहे. ‘फेज-वन’चे भूसंपादन पूर्ण करण्यासाठी आता महापालिकेने एप्रिल महिन्याची डेडलाइन दिली आहे.

मागील सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दोन उड्डाणपुलांच्या प्रकल्पाला मागील सहा महिन्यांपासून गती आली आहे. जुना पुणे नाका ते पत्रकार भवनपर्यंत या मार्गावरील उड्डाणपुलासाठीची प्रक्रिया वेगात सुरू असून, आतापर्यंत 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. साडेपाच किलोमीटर मार्गाच्या भूसंपादनासाठी रेडीरेकनर दरानुसार एकूण सहा टप्पे पाडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवाडा मंजूर करून घेण्यात येत आहे.

या मार्गातील शासकीय जागांचा विषय महापालिकेकडे असून, भूसंपादन विभागाकडे केवळ खासगी जागांसाठीची प्रक्रिया केली जात आहे. या मार्गावर एकूण 102 खासगी मिळकती असून, त्यातील 73 मिळकतींची निवाडा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित 32 मिळकतींच्या निवाडय़ासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, या महिन्याअखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ‘फेज-वन’मधील उड्डाणपुलाचा निवाडा जाहीर करून मिळकतदारांना मोबदला देण्यासाठी एप्रिल महिन्याअखेरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून द्यावे, अशा सूचना आयुक्त शीतल तेली-उगले यांनी भूसंपादन विभागाला दिल्या आहेत, तर मुदतीत काम पूर्ण होण्यासाठी महापालिकेने आपल्या हिश्श्यापोटीची रक्कम वेळेत भरणा करून घ्यावी, असेही भूसंपादन विभागाकडून सांगण्यात आले.

‘या’ मिळकतींचा निवाडा प्रलंबित

जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला या उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला मार्च महिना उजाडणार आहे. हेरिटेजच्या यादीत असलेले आहेरकर बजार, सर्व्हिस रोडवर येणारे वैष्णवी हॉटेलचे कॉलम, सर्व्हिस रोडला बाधित होणारी नाथ प्लाझाची गॅलरी, पुनर्वसनाची मागणी असलेली वाडादी चाळ, पांजरापोळ व एसटी स्थानक, पापय्या तालीम आदी मिळकतींचा निवाडा तांत्रिक त्रुटीसाठी प्रलंबित आहे.