सोलापूर मनपाचे यंदाचे बजेट डिजिटल स्वरूपात, प्रशासनाकडून तयारी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका प्रशासनाने डिजिटल अंदाजपत्रक मांडण्याची तयारी केली आहे. महापालिकेचे 2021-22 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक प्रशासनाने तयार केले आहे.

यावेळचे अंदाजपत्रक अनेकदृष्टीने वैशिष्टय़पूर्ण राहण्याची शक्यता आहे. कारण महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन अनावश्यक तरतुदींना यामध्ये फाटा दिला गेला आहे. गेल्या वर्षात कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे नव्या वर्षात उत्पन्न कसे वाढेल याचा विचार अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. खासकरून आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने यावेळी अंदाजपत्रकावर होणारा छपाईचा खर्च कमी करून डिजिटल पद्धतीने अंदाजपत्रक तयार केले आहे. पदाधिकारी आणि नगरसेवकांनी मान्यता दिली, तर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच डिजिटल पेपरलेस अंदाजपत्रक सभागृहात मांडले जाईल, अशा पद्धतीने अंदाजपत्रक सादर झाले, तर सोलापूर महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरेल.

महापालिकेत भाजप सत्तेवर आल्यानंतरचे हे पाचवे आणि अखेरचे अंदाजपत्रक असेल. यंदा स्थायी समिती अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रक पूर्वीप्रमाणे आधी स्थायी समितीकडे आणि नंतर अंतिम मान्यतेसाठी ते सर्वसाधारण सभेकडे जाईल. गेल्या तीन वर्षांत स्थायी समिती अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासनाने अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेकडे पाठवले होते. प्रशासनाने वेळेवर अंदाजपत्रक तयार केले असले, तरी ते सभागृहापुढे कधी येईल ते सांगणे कठीण आहे.

31 मार्चपूर्वी अंदाजपत्रकाला मंजुरी मिळणे आवश्यक असते. काँग्रेसची सत्ता असताना 31 मार्च रोजी रात्री 12 वाजता अंदाजपत्रकाला मंजुरी मिळत असे. गेल्या चार वर्षांत भाजपला एकदाही वेळेवर अंदाजपत्रक मांडता आले नाही. गेल्या वर्षी भाजपला कोरोनाचे निमित्त मिळाले. तब्बल दहा महिन्यांनंतर अंदाजपत्रक सभागृहात आणून घाईगडबडीत अंदाजपत्रक मंजूर करून घेतले.

दरवर्षी तीनवेळा अंदाजपत्रकाच्या पुस्तकाची छपाई केली जाते. जवळपास तीनशे पुस्तकांच्या छपाईवर पाच लाख रुपये खर्च केला जातो. यंदा पुस्तक कमी पानांचे आणि सुटसुटीत करण्याचा प्रयत्न राहील. पेपरलेस अंदाजपत्रकाला मान्यता मिळाली, तर आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेला काडीचा आधार मिळेल. आयुक्तांनी परवानगी दिली, तर हे अंदाजपत्रक मोबाईल ऍपवरदेखील उपलब्ध करून देणे शक्य आहे.

– शिरीष धनवे, मुख्य लेखापाल, सोलापूर मनपा.