सोलापूर महापालिका; अर्थसंकल्पीय सभेत भाजप नगरसेवकांचा राडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा नगरसेवकांच्या राड्याने चांगलीच गाजली. स्थायी समितीच्या सभापती रणजिता चाकोते यांनी करवाढ-दरवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केला. सुमारे १४४९ कोटींच्या अर्थसंकल्पाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

सोलापूर महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा आज महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत चर्चेदरम्यान भाजपचे नगरसेवक प्रशांत पल्ली आणि नगरसेवक अमोल शिंदे यांच्यात राडा झाला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग ओढवल्याने सभागृहात तणाव निर्माण झाला. नगरसेवक शिंदे सभागृहात चर्चा करीत असताना भाजपचे नगरसेवक पल्ली हे वारंवार अधिकाऱ्यांची बाजू घेत अडथळा आणत होते. यावरून संतप्त झालेले शिंदे हे पल्ली यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी काही नगरसेवकांनी मध्यस्थी करीत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला, तर महापौर कोंड्याल हे पल्लींची बाजू घेत असल्यामुळे वातावरण तापले.

स्थायी समितीच्या सभापती रणजिता चाकोते यांनी २०२६-२७ या वर्षाचा १४४९ कोटी ७१ लाख ९३ हजार ४०१ रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यात कोणतीही करवाढ-दरवाढ नसली, तरी छुपे कर लावण्यावरून भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून करवाढीचा प्रस्ताव गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.