यापुढेही पाऊसच ठरविणार कांद्याचा दर! सोलापूर एपीएमसीत कांदा शेतकऱयांना रडवणार?

onion-market

यंदाच्या हंगामात पावसाने कहर केल्यामुळे बहुतांशी कांदा शेतकऱयांचे अर्थकारण बिघडले आहे. शेतकऱयांनी उत्पादित केलेल्या कांद्याचा दर पावसावरच अवलंबून असल्याचे दिसून आले. प्रथम पडलेल्या पावसामुळे काद्यांचे भाव वाढले. आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार यापुढे पाऊस पडला तर भाव आणखी वाढण्यासारखी परिस्थिती आहे. जर पाऊस नाही पडला तर दर कोसळतील, असा तज्ञांचा अंदाज आहे. पर्यायाने कांद्याच्या बाजारभावात अस्थिरता निर्माण झाली आहे.

दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हंगामात कांद्याला चांगला भाव मिळतो. पण सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आकडेवारीवरून कांद्याच्या दराबाबत साशंकता निर्माण झाली आहे. कारण ज्या भागात जास्त पाऊस झाला तिथले उत्पादन घटले पण कांही भागात कांदा चांगल्या परिस्थितीत आहे. त्यामुळं बाजारात येणाऱया नव्या कांद्याची आवक वाढली आहे. त्यातच पावसाने तीन दिवसांपासून उघडीप दिल्याने नवा कांदा येत आहे. त्याचप्रमाणे साठवलेला जुना कांदाही बाजारात येत आहे.

सोलापूर बाजार समितीत एकाच दिवशी 213 गाडय़ांची आवक झाली. तेवढय़ा कांद्याचा लिलाव होऊन तो इतरत्र पाठविलाही गेला. कांद्याच्या खरेदी विक्रीतून बाजार समितीत 4 कोटी 70 लाख 13 हजार रुपयांची उलाढाल झाली. या आर्थिक उलढालीतून बाजार समितीला मोठय़ा प्रमाणात सेसही मिळतो. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीस घेऊन येण्यास शेतकरी प्राधान्य देतात. त्यात पुणे, नगर, बीड, धाराशीव, सोलापूर आणि कर्नाटकातील बागलकोटपासूनचे कांदा किक्रीसाठी येतात.

एक नंबर कांद्याला 4100 चा भाव

आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 213 ट्रक कांद्याची आवक झाली. त्यात कमीत कमी दर 100 रुपये व सर्वसाधारण कांद्याला क्विंटलला 2200 रुपये दर मिळाला. एक नंबर कांद्याला 4100 रुपये दर मिळाला आहे. सोलापूर बाजार समिती ही राज्यात कांद्याच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. बाजार समितीत दरवर्षी मोठय़ा प्रमाणात कांद्याची आवक होते. तेवठय़ा कांद्याची लिलाव प्रक्रिया बिनदिक्कतपणे बाजार समितीमध्ये केली जाते. त्याचबरोबर राज्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत शेतकऱयांच्या कांद्याला सोलापुरात भावही चांगला मिळतो.

केंद्राने कांदा निर्यात बंदी करू नये

केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दक्षिण कर्नाटक येथील व्यापारी कांदा खरेदीसाठी सोलापुरात येतात. शिवाय दिल्ली, बंगाल आणि पुढे आखाती देशांतही सोलापूरचा कांदा निर्यात केला जातो. त्यामुळे सध्या कांद्याचे भाव वाढतानाचे चित्र आहे. अशा परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी करु नये, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. कारण, पावसाचा मार झेललेल्या शेतकऱयांना वाढत्या दराचा आधार मिळणार आहे.