सोलापूरात पोलीस निरीक्षकासह सहायक निरीक्षक गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुरूमचोरी प्रकरणाच्या गुह्यात मदत करण्यासाठी ठेकेदाराकडून साडेसात लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱया सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत नारायण पवार व सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत सहा पोलीस अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अडकले आहेत.

सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुरूमचोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुह्यातील आरोपींना मदत करून गुह्यातून सहीसलामत सुटण्यासाठी सहकार्य करण्यासाठी पोलीस निरीक्षक संपत पकार यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे याच्याकरवी 10 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती साडेसात लाख रुपये देण्याचे ठरले होते.

दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जुना पूना नाका परिसरात सापळा लावला.

यावेळी खंडागळे याने पैसे स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडले. चौकशीत त्याने पोलीस निरीक्षक संपत पकार यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्याचे सांगितले. त्यानंतर संपत पवार यांना शासकीय विश्रामगृहातून ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संपत पवार हे चार महिन्यांनंतर निवृत्त होणार होते.

दोघेही अधिकारी 24 तासांत निलंबित

सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत पवार व सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तडकाफडकी निलंबित केले. लाचप्रकरणी कोठडीत असलेल्या या दोन अधिकाऱयांवर अवघ्या 24 तासांत कारवाई झाली आहे. या दोघांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.