Solapur Flood – हतबल शेतकऱ्याने अचानक येऊन फडणवीसांचा ताफा अडवला, कैफियत मांडण्याचा प्रयत्न; महिलांचा आक्रोश

अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीने बाधित झालेल्या परिसराची पाहणी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परत निघाले. यावेळी एका हतबल झालेल्या शेतकऱ्याने अचानक ताफ्यासमोर येऊन ताफा अडवला आणि आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी या शेतकऱ्याला दूर करून मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्याला वाट करून दिली.

माढा, मोहोळ, करमाळ्यात पावसाचे थैमान; सीना नदीला महापूर, 40 गावांचा संपर्क तुटला; ‘एनडीआरएफ’चे पथक दाखल; शाळांना सुट्टी

मुख्यमंत्री फडणवीस हे आपत्तीग्रस्त लातूर व सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज त्यांनी माढा तालुक्यातील निमगाव आणि दारफळ या गावांना भेटी देऊन बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अक्षरशः डोळ्यात पाणी आणून शेतकऱ्यांनी, विशेषतः ग्रामीण महिलांनी मुख्यमंत्र्यांना परिस्थितीचे गांभीर्य दाखवून दिले.

याच गावातून मुख्यमंत्री परतीच्या वाटेवर असताना एक शेतकरी अचानक धावत रस्त्यावर आला आणि त्याने मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवला. हातवारे करीत तो मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्याला समजावून बाजूला केले आणि मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा पुढे सरकला.

अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका; रस्ता खचला, जनावरं वाहून गेली, जनजीवन विस्कळीत

या दौऱ्यात बांधापर्यंत आलेल्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी परिस्थितीची जाणीव करून दिली व आपल्या मागण्याही त्यांच्यासमोर मांडल्या.  मुख्यमंत्र्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सर्व बाधित शेतकऱ्यांना अधिकाधिक आणि लवकरात लवकर मदत देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.