आम्ही काळजी घेतो; तुम्ही शाळा सुरू ठेवा! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओमायक्रोन व्हेरिएंटच्या संसर्गामुळे राज्यातील सर्व शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे शाळेत जाता येणार नसल्याने निराश झालेल्या सोलापुरातील एका विद्यार्थ्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. ‘आम्ही काळजी घेतो; तुम्ही शाळा सुरू ठेवा’, अशी विनंती पाचवीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सोलापूर येथील पेंद्रीय विद्यालय, सेंट्रल रेल्वे या शाळेत पाचवीत शिकणाऱ्या कौस्तुभ प्रभू याने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सरसकट शाळा बंद करू नका, अशी मागणी केली आहे. या विद्यार्थ्याने स्वतःच्या हस्ताक्षरात प्रथमच मराठीतून पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तुम्ही विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजीने शाळा प्रत्यक्ष बंद ठेवत आहात, पण ऑनलाइन शिक्षण खेडय़ापाडय़ातील अनेक विद्यार्थ्यांना सोयीसुविधांअभावी घेणे शक्य नाही. आमचे शिक्षक अनुभवी आहेत, पण गणित, विज्ञानसारखे विषय शिकविण्यासाठी ऑनलाइनमध्ये मर्यादा पडतात. या विषयांचा आमचा शैक्षणिक पाया मजबूत होत नाही’, असे कौस्तुभने पत्रात म्हटले आहे. आम्ही स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन परत शाळेत येण्यास उत्सुक आहोत, तुम्ही प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असेही त्याने पत्रात सांगितले आहे.

काही शिक्षक वर्गातूनही प्रत्यक्ष वर्ग सुरू ठेवण्याची मागणी होत आहे. हॉटेल्स, मॉल्स, कार्यालये 50 टक्के उपस्थितीत सुरू असल्याने शाळा, महाविद्यालयांनाही तशी मुभा मिळावी असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

कोरोनाचा एकही रुग्ण नाही अशा ठिकाणच्या शाळा सुरू ठेवा

कोरोनाचा एकही रुग्ण नाही, अशा ग्रामीण भागातील शाळा सुरू ठेवाव्यात असे मराठी शाळा संस्थाचालक मंडळाचे सुशील शेजुळे यांनी सांगितले. 50 टक्के विद्यार्थी उपस्थितीत शाळा सुरू ठेवणे योग्य राहील. शिक्षकांचेही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही टप्पे पूर्ण झाले असून शहरी भागात जेथे कोरोना संसर्ग झालेले रुग्ण सापडत आहेत तेथील शाळा वगळून अन्य ठिकाणच्या शाळांचे वर्ग भरविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने लवकरात लवकर घ्यावा. शिक्षकांनीही यापुढे वर्क फ्रॉम होमची मागणी करू नये. शाळेत येण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू ठेवली पाहिजे, असेही शेजुळे म्हणाले.

शाळा बंद करू नका! ‘मेस्टा’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ऑनलाइन शिक्षणामुळे मागील दोन वर्षांत विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून शाळा बंद ठेवणे हा कोरोनावरील उपाय नाही. त्यामुळे शाळा बंद करू नका, अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशननेही (मेस्टा) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

‘मेस्टा’ने यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. 23 ऑक्टोबरला शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्याने खासगी शाळांची डबघाईला आलेली परिस्थिती सुधारली. शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे रखडलेले पगार, इमारत भाडे, वीज आणि पाणी बिल हे खर्च भागवणे शक्य झाले. आता पुन्हा शाळा बंद केल्याने हे आर्थिक गणित कोलमडणार आहे, असे ‘मेस्टा’चे संचालक संजय तायडे पाटील यांनी सांगितले. विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळत असले तरी ते बरे होत आहेत असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

सर्व काही सुरू आहे, पण शिक्षण मात्र बंद. याचे परिणाम दूरगामी आणि भयावह असतील ते वेळीच टाळायला हवेत. युरोप आणि अमेरिकेसारख्या देशांत कोरोनाची परिस्थिती आपल्यापेक्षा बिकट आहे, मात्र त्यांच्याकडे ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा अनेक पटीने चांगल्या असूनही शाळेतील वर्ग नियमितपणे सुरू आहेत.

वसंत काळपांडे, शिक्षणतज्ञ