सोलापूर जिल्ह्याच्या गावागावांत ग्राम समितीची स्थापना, परराज्यांतून व जिल्ह्यांतून येणाऱयांवर लक्ष ठेवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गावात येणाऱया व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी ग्राम समिती गठीत केली आहे. तलाठी हा पदसिद्ध अध्यक्ष असून, यात सातजण सदस्य आहेत. परराज्यांतून व जिल्ह्यांतून येणाऱया नागरिकांवर ही समिती विशेष लक्ष ठेवणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दररोज दीड हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. जवळपास 15 हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, दररोज 25-30 जणांचा मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मिलिंद शंभरकर यांनी गावपातळीवर कृती समिती गठीत केली आहे.

सातजणांच्या या समितीत तलाठी पदसिद्ध अध्यक्ष असून, विविध कार्यकारी सोसायटी सचिव, कृषी सहायक, आरोग्यसेवक, महिला बचत गट, ग्रामसंघ अध्यक्षा, महिला बचत गट सचिव, पोलीस पाटील हे सदस्य राहणार आहेत.

एखाद्या परजिल्हा व राज्यातून नागरिक आल्यास त्यांची माहिती ग्रामपंचायत स्तरावर तयार करून गटविकास अधिकाऱयांमार्फत तहसीलदारांना देण्यात येणार आहे. त्या व्यक्तींची तपासणी खासगी डॉक्टर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येईल.

कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यास होम किंवा इन्स्टिटय़ूशन आयसोलेशनमध्ये ठेवण्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱयाला माहिती देण्यात येईल. ही समिती गावात बाहेरून येणाऱयांवर विशेष लक्ष ठेवणार आहे.