डॉ. कलाम यांच्या ‘अग्निपंख’ने दिले सोमनाथ माळीच्या स्वप्नांना ‘बळ’; गावखेड्यातील युवक झाला इस्रोचा शास्त्रज्ञ

>> सुनील उंबरे

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची ‘अग्निपंख’ ही कादंबरी वाचून प्रभावित झालेला गावखेड्यातील शेतमजुराचा एक मुलगा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (ISRO)शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाला आहे. ही अवघड गोष्ट सोमनाथ माळी या जिद्दी युवकाने मेहनतीच्या जोरावर सत्यात उतरवली आहे. इस्रोने देशभरातून सहा शास्त्रज्ञाची नुकतीच निवड केली त्यामध्ये महाराष्ट्रातून सोमनाथ हा एकमेव आहे.

पंढरपूर तालुक्यातील सरकोली या अतिशय छोट्या गावखेड्यातील शेतमजुरांचा मुलगा सोमनाथ. सोमनाथचे प्राथमिक शिक्षण सरकोली येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत झाले. सोमनाथ पहिलीच्या वर्गापासून हुशार असल्याने आपलं पोरगं आपलं नावं काढलं म्हणून आई आणि वडिलांनी रक्ताचं पाणी करुन शिकवण्याचा निर्णय घेतला.

प्राथमिक शिक्षण सरकोलीत अन महाविद्यालयीन शिक्षण पंढरपूर येथे घेतल्यानंतर सोमनाथने मुंबई गाठली. महाविद्यालयीन जीवनात सोमनाथच्या वाचनात डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक आले. डॉ. कलाम यांचा खडतर जीवन प्रवास, त्यांची जिद्द आणि त्यांनी देशासाठी दिलेले योगदान वाचून सोमनाथ प्रभावित झाला. आपणही डॉ. कलाम यांच्याप्रमाणे शास्त्रज्ञ व्हायचे आणि देशसेवा करायची असा मनोमन चंग बांधला अन त्या दिशेने वाटचाल सुरु केली.

शिक्षणाचा एकएक टप्पा पार करीत सोमनाथ एम. टेकपर्यत पोहचला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोमनाथला इन्फोसेसमध्ये नोकरी लागली. मात्र, ध्येय होते भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोत (ISRO) शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याचे, या एकमेव ध्येयापुढे सोमनाथने आर्थिक, शैक्षणिक अडथळे सहजपणे पार करुन आपले स्वप्न साकार केले. सोमनाथच्या स्वप्न पूर्ण झाले पण त्याच्या आईवडिलांना आपल्या कष्टाचे चीज झाल्याचा आनंद आभाळाएवढा आहे. 2 जून रोजी झालेल्या इस्रोच्या नियुक्तीनंतर सोमनाथ नुकताच आपल्या गावी आला होता. गावकऱ्यांनी सोमनाथचे जंगी स्वागत करुन त्याचा सत्कार केला.

आपली प्रतिक्रिया द्या