भयंकर! पोटच्या मुलाने गॅस सिलिंडर डोक्यात घालून आईची केली हत्या

दारूच्या नशेत मुलाने आईच्या डोक्यात गॅस सिलिंडर घालून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना सोलापूर येथील संजय गांधीनगरमध्ये दोन नंबर झोपडपट्टीत घडली. घरगुती कारणातून ही हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. शरणक्का दत्ताप्पा गोळसर (वय 65) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी सिद्धाराम दत्तप्पा गोळसर (वय 32) या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून संशयित आरोपी सिद्धाराम गोळसर हा आपल्या आईशी दारू पिऊन वाद घालत होता. गेल्या तीन दिवसांपासून सारखे भांडण सुरू होते. सिद्धाराम याने आईच्या डोक्यात सिलिंडर घातला. घटना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याकेळी आरोपी हा घटनास्थळी उपस्थित होता. पोलिसांनी त्याची विचारपूस केली. यावेळी नशेमध्ये तो पोलिसांनाही उलटसुलट उत्तरे देत होता. ‘तुम्ही कोणीही माझ्या आईच्या मृतदेहाला हात लावू नका, इथून तिला घेऊन जाऊ नका,’ असे म्हणत आरडाओरडा करीत होता. ‘अंत्यसंस्कार आम्ही सर्व बांधव मिळून करू,’ असे तो म्हणत होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. याप्रकरणी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या