मुलानेच केला बापाचा खून; अपघाताचा बनाव उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

लोखंडी पहार डोक्यात घालून मुलानेच बापाचा खून केल्याची घटना कागल तालुक्यातील केनवडे येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे. वडिलांचा अपघात झाल्याची फिर्याद त्याने कागल पोलिसांत दिली होती. मात्र, अपघाताबाबत संशय आल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलून घातपाताच्या दिशेने तपास केला. तपासात मुलानेच अपघाताचा बनाव करून वडिलांचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती करवीरचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी दिली.

दत्तात्रय रामचंद्र पाटील असे खून झालेल्या वडिलांचे नाव असून, अमोल दत्तात्रय पाटील याला कागल पोलिसांनी अटक केली आहे. कागल-निढोरी मार्गावरील केनवडे ओढय़ाच्या पुलावर वाहनाच्या धडकेत दत्तात्रय पाटील यांचा अपघात झाल्याची फिर्याद कागल पोलिसांत दाखल झाली होती.

दरम्यान, घटनेचा पंचनामा करताना पोलिसांना पाटील यांच्या अंगावर कोठेही खरचटल्याचे दिसून आले नाही. केवळ त्यांच्या डोक्यालाच मार लागल्याचे समोर आले होते. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी घातपाताच्या दिशेने तपास सुरू केला. यात पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले.

दत्तात्रय पाटील कामानिमित्त इचलकरंजीत राहत होते. दोन महिन्यांतून एकदा ते घरी येत. घरी आल्यावर दारू पिऊन ते पत्नी आणि मुलासोबत भांडण करत होते. याच रागातून अमोलने वडिलांच्या डोक्यात पहार घालून त्यांचा खून केला व अपघात झाल्याचा बनाव केला होता. यानंतर पोलिसांनी अमोल पाटील याला अटक केली आहे.

पोलीस उपअधीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, विजय पाटील, महादेव बिरंजे, विनायक औताडे, आनंदा कोंडरे, संदेश पोवार, सिल्वा कोडनाईक यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीला आणला.