
सामना प्रतिनिधी । लातूर
वडिलांच्या खूनाची चौकशी करावी यासाठी तालूक्यातील मौजे तांदूळजा येथे अशोक शंकर थळकर या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. १ मार्च रोजी अशोक याच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. पण हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप अशोकने केला आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी त्याने केली आहे.
अशोकने यासंबंधी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांना अनेकवेळा निवेदने दिली. पण त्यांच्या निवेदनांची साधी दखलही कोणी घेतली नाही. यामुळे अशोकने मागील ९ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. १ मार्च २०१८ रोजी पहाटे ४ ते ६.३० च्या सुमारास अशोकचे वडील शंकर पुंडलिक थळकर शेताकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र तो अपघात नसून नियोजनबध्द पध्दतीने केलेला खूनच आहे. कारण ज्या ठिकाणी हा अपघात घडला. त्यापासून बऱ्याच अंतरावर वडीलांचे बूट, टॉवेल सापडले आणि मृतदेह दुसऱ्याच सापडला आहे. त्यामुळे त्यांचा घात झाला असा आमचा संशय आहे. वडीलांच्या शरीराजवळ कुठेही रक्ताचे डाग नव्हते. पण शरीरावर गंभीर जखमा झालेल्या होत्या. पोलिसांनी केवळ अपघाताची नोंद घेतली. तक्रार करुनही खूनाच्या दृष्टीने काहीच तपास केलेला नाही. ज्या रस्त्यावर ही घटना घडली त्या ठिकाणी असणाऱ्या दुकानात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत. पण पोलीस त्यांचा उपयोग करत नाही. यामुळे सीआयडीकडे हे प्रकरण सोपवावे. असे अशोकचे म्हणणे आहे.





























































