
लडाखमधील लेह येथे २४ सप्टेंबर रोजी भडकलेल्या हिंसेत चार जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांनी केली आहे. लेहमधील ‘जेन-झी’ आंदोलनानंतर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आलेले वांगचुक यांनी जोधपूर सेंट्रल जेलमधून पत्र लिहूनही मागणी केली आहे.
या पत्राद्वारे सोनम वांगचुक म्हणाले आहेत की, “ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमी आणि अटक झालेल्यांसाठी मी प्रार्थना करतो. चार जणांच्या मृत्यूची चौकशी स्वतंत्र न्यायिक आयोगाकडून झाली पाहिजे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत मी तुरुंगातच राहणार आहे.”
सोनम वांगचुक म्हणाले आहेत की, ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ठीक आहेत आणि सर्व हितचिंतकांचे आभार मानले. पत्रात त्यांनी LAB आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (KDA) यांना पूर्ण पाठिंबा दर्शविला. त्यांनी लिहिले की, “लडाखला राज्याचा दर्जा देण्याची आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची आमची मागणी संवैधानिक आणि न्याय्य आहे. LAB लडाखच्या हितासाठी जे काही पाऊल उचलेल त्याचे मी पूर्ण समर्थन करतो.”
हे पत्र लेह एपेक्स बॉडीचे (LAB) कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट मुस्तफा हाजी यांनी शेअर केले होते. ते आणि वांगचुक यांचे भाऊ त्सेतान दोर्जे ले यांनी ४ ऑक्टोबर रोजी तुरुंगात वांगचुक यांची भेट घेतली.