वांगचुक यांचा पाकिस्तान दौरा युनोच्या कार्यक्रमाचाच भाग, सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा मोदी सरकारवर हल्ला

लडाखमधील पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी गीतांजली अँगमो कमालीच्या संतापल्या आहेत. त्यांनी केंद्र सरकारसह भाजपवर हल्ला चढवला आहे. ‘वांगचुक यांचा पाकिस्तान दौरा हा संयुक्त राष्ट्राच्या परिषदेचा भाग होता. हवामान बदल हा त्यातला विषय होता. त्याचा इतर कुठल्याही गोष्टीशी संबंध नव्हता, असे गीतांजली यांनी स्पष्ट केले आहे.

वांगचुक यांचा पाकिस्तानशी संबंध जोडून त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केल्याबद्दल गीतांजली यांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘वांगचुक हे पर्यावरण व नावीन्यपूर्ण शिक्षणाच्या क्षेत्रात काम करतात. त्यानिमित्ताने ते सर्वत्र फिरत असतात. त्यांच्या पाकिस्तान दौऱ्यात मीही त्यांच्या सोबत होते. या दौऱ्याचा विषय हवामान बदल हा होता. हवामान बदलाचा देशाच्या सीमांशी संबंध नसतो. नरेंद्र मोदी स्वतः चीनला जातात. प्रश्न हेतूचा असतो. आम्ही हिंदुस्थानसोबत आणि सत्यासोबत आहोत, असे त्यांनी ठणकावले.

गेल्या चार वर्षांपासून वांगचुक हे शांततेने त्यांचे म्हणणे मांडत आहेत. सरकारने जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करावीत याच त्यांच्या मागण्या आहेत. त्यामुळे लेहमधील हिंसाचारासाठी त्यांना जबाबदार धरणे पूर्णपणे चूक आहे. आंदोलन झाल्यानंतर सर्वात आधी निषेध करत त्यांनी उपोषण मागे घेतले, याकडे गीतांजली यांनी लक्ष वेधले. ‘हिंदुस्थानी लष्करासाठी आणि सैनिकांसाठी उष्ण निवारे बांधण्याचे काम ते गेल्या काही वर्षांपासून करत आहेत. अशा माणसापासून देशाला काय धोका असू शकतो, असा सवालही त्यांनी केला. वांगचुक यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत चर्चा करण्याची माझी तयारी आहे. केंद्र सरकारमधील कोणीही टीव्हीवर प्राईम टाइमला टीव्हीवर यावे आणि चर्चा करावी, असे आव्हानच त्यांनी दिले.

भाजपवाले हिंदू असूच शकत नाहीत!

सत्य हाच हिंदुत्वाचा आधार आहे, पण भाजपवाल्यांचा पाया लबाडी आणि खोटारडेपणा आहे. त्यामुळे हे लोक हिंदू असूच शकत नाहीत, असा संताप गीतांजली यांनी व्यक्त केला. ‘मी स्वतः श्री अरबिंदो यांची अनुयायी आहे. एक शिक्षक आहे. वेद आणि भगवद्गीता हा विषय शिकवते आणि याच विषयांची अभ्यासकही आहे. भाजपचा हिंदुत्ववाद वेद आणि वेदांताला अपेक्षित नाही,’ असेही त्या म्हणाल्या.