धतिंग नाच!!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या चित्रपटांत आयटम साँगची चलती आहे. एखादी कल्पना घेऊन त्यावर ताल, लयीचा जास्तीतजास्त वापर करून…वेगळंच नृत्य बसवून ती मसालेदार गोष्ट लोकांसमोर आणायची. लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे या गाण्यावर थिरकताहेत. या निमित्ताने प्रवीण तरडे, गीतकार प्रणीत कुलकर्णी आणि नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव यांच्याशी गप्पा…

pravin-trdeदहा दिवसांत दहा लाख लोकांपर्यंत गाणं

भाईटम गाण्याच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच नाचलो आहे. ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमातील गाण्यामध्ये सगळे गुन्हेगार नाचत आहेत. गुन्हेगार आणि बिल्डर लॉबी. त्यामुळे त्या पद्धतीची देहबोली मला घ्यायची होती. मी कितीही चांगले लिहित असलो, लेखक-दिग्दर्शक असलो तरी दिसतो गुन्हेगारासारखा. त्यामुळे मी त्या भूमिकेला बरोबर सूट झालो. या आधी कधीच नाचलो नाही. नाचण्याचा आणि माझा दूरदूरचा संबंध नाही. ‘देऊळ बंद’मध्ये एक-दोन स्टेप्स केल्या, पण त्याला काही नाचणं म्हणत नाहीत. त्यामुळे माझ्यासाठी नाचणं फार अवघड होतं. नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव त्यांनी माझ्याकडून ते करवून घेतलं. एक तर त्याला माहित होतं की मला नाचता येत नाही. त्यामुळे त्यांनी मला करता येतील त्याच स्टेप्स दिल्या. आणि दोनच दिवसात त्या मला जमून गेल्या. पहिले दीड दोन तास घाम फुटला. माझे पायच अडकायचे, एकावेळी हलवायचे कसे पाय, तास दीड तास मी समजून घेतले. पायात अडकून पडणे गमतीशीर होतं. पहिले दीड तास कष्ट पडले. डेव्हलपमेण्टच्या गदारोळात विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांची ही गोष्ट आहे. मुळशी पॅटर्न आहे. सिनेमाच्या शेवटी प्रेक्षक शंभर टक्के रडणार एवढी माझी खात्री आहे.

– प्रवीण तरडे, लेखक-दिग्दर्शक-अभिनेते

 pranit-kulkarniगोष्टीच्या आत गाणी लिहायला मिळाली

अराररारा खतरनाक… हे गाणं थोडंसं मी त्या भूमिकेत जाऊन लिहिलेले आहे. जसा संवादलेखकाला भाषेचा लहेजा, कोण करणार आहे याचा विचार करावा लागतो, तसा विचार गीतकारालाही करावा लागतो की हे गाणे कुणावर म्हणजे सिनेमातल्या कुठल्या व्यक्तिरेखेवर चित्रीत होणार आहे. जेव्हा मला दिग्दर्शक प्रविण तरडेंनी सांगितले की गाणे भाई लोकांवर आहे. त्यामुळे पुण्यातल्या काही ठिकाणं पाहिलं, यूटय़ुबवर सर्च केलं. तिथे ना त्या वातावरणाचा वेगळा परिणाम असतो. त्याच्यामध्ये वेगळ्याच अनाऊन्समेण्ट होत असतात. गुंड, राजकारणी आणि बिल्डर असा सगळा तो प्रकार असतो. त्याच्यामध्ये अनेक लोक त्या भाईच्या वाढदिवसाला येत असतात. मला नेहमीच वाटते की गीतकाराला आपल्या गीतातून सर्व काही म्हटता आले पाहिजे. नुसते त्या परिस्थितीला गाणं बसवायचं नाही. गाणं गोष्टीच्या आत गेलं पाहिजे. हे सगळं त्या गाण्यात आलं पाहिजे आणि त्यात मनोरंजनही असायला हवे. मनोरंजन आणि राजकारण याचा मिलाफ पाहायला मिळतो. हे गाणं साधारण अर्ध्या तासात रचले. प्रविण तरडेंवर हे गाणं असल्याने ‘अरारारा खतरनाक’ हे सुचलं. दोन एक अडीच तासात नरेंद्र भिडेंनी ते संगीतबद्धही केलं. याआधी मी ‘देऊळ बंद’ची गाणी लिहिली. ती भक्तिरसातली गाणी होती, पण हे गाणं जरा हटके आहे. वेगवेगळ्या मूडमधली गाणी आतापर्यंत लिहिली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला गोष्टीच्या आत गाणी लिहायला मिळाली त्याचा आनंद आहे.

-प्रणीत कुलकर्णी, गीतकार

 umesh-jadhavअसं गाणं क्वचित मिळतं

या गाण्यात एखादी मुलगी नाही, म्हणून कुठलंही अंगप्रदर्शन नाही. कथानकाची गरज आहे म्हणून हे गाणं आहे. या गाण्याची क्रेझ थीएटरमध्ये पाहायला मजा येणार आहे. प्रविण तरडेंना सांगितले तू तालमीला येऊ नकोस. त्याची गरज नाही. जे मी दाखवतो ते तुझ्या देहबोलीमध्ये कर. जसं जमतं तसं कर. संध्याकाळी सहा साडेसहाला शूट सुरु व्हायचं ते सकाळी साडेसहापर्यंत… अशा दोन दिवसात ते गाणं शूट केलं. प्रविणने ते छान केलं. आजुबाजूला असलेल्या लोकांनीही खूप छान काम केलंय. गंमत म्हणजे त्या चारशे-पाचशेच्या मॉबमधले सगळेच डान्सर नव्हते. त्यात फक्त आठ ते दहा डान्सर होते. म्हणजे ते कोणत्या कडव्यानंतर कोणती स्टेप आहे हे त्यांच्या लक्षात यावे यासाठी होते. यात योगायोग असा की नरेंद्र भिड़े यांनी आयुष्यात कधीच अशा पद्धतीचे गाणे संगीतबद्ध केलं नाही, प्रणीत कुलकर्णी यांनी अशा प्रकारचे हटके गाणे लिहिले नाही आणि सोबत कॅमेरामन महेश लिमये अशी आमची गट्टी जमली. त्यामुळे हे गाणं छान वर्क झालं. सगळ्यांची मेहनत त्यात दिसतेय. असं गाणं क्वचित मिळतं आणि ते लोकांना आवडले की मजा येते.

-उमेश जाधव, नृत्यदिग्दर्शक