टाटा स्कायवरून ‘सोनी मराठी’ गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंंबई

गेल्या महिन्यापासून नव्यानेच सुरू झालेली आणि विविध हिंदी आणि मराठी वाहिन्यांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या ‘सोनी मराठी’ वाहिनीवर महाराष्ट्रातच अन्याय झाल्याचे उघड झाले आहे. टाटा स्काय कंपनीने आपल्या वाहिन्यांमधून सोनी मराठी वाहिनीच गायब करून टाकली आहे. या वाहिनीचा 1220 हा सबस्क्रायबर क्रमांकही काढून टाकण्यात आला आहे. महाराष्ट्रातच एका मराठी मनोरंजन वाहिनीची अशाप्रकारे गळचेपी करून टाकल्याने मराठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

केवळ महिनाभरातच सोनी मराठी वाहिनीने आपला वैविध्यपूर्ण विषय असलेल्या मालिकांमुळे मराठी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना या मालिका भुरळ घालत आहेत. त्यामुळे ही वाहिनी कमी कालावधीतच लोकप्रिय झाली. परंतु या टप्प्यावर टाटा स्कायने ही वाहिनीच बंद करून मराठी प्रेक्षकांवर अन्याय केल्याचे सोनी मराठी मनोरंजन वाहिनीचे बिझनेस हेड अजय भालवणकर यांनी सांगितले.

रविवारी मध्यरात्रीपासून वाहिनी बंद

रविवारी मध्यरात्री 12 वाजल्यानंतर सोनी मराठी वाहिनी बंद करून टाकण्यात आली. महाराष्ट्रातच एखादी मराठी मनोरंजन वाहिनी अशाप्रकारे बंद केली जाते याबाबत आश्चर्य वाटल्याचे भालवणकर म्हणाले. सोनी मराठी वाहिनी मुंबईतूनच चालवली जाते. विशेष म्हणजे ग्राहकांना किंवा सोनी मराठी वाहिनीला कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता ही वाहिनी बंद करण्यात आली. इतकेच नाही तर सबस्क्रायबर क्रमांकही काढून टाकण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

22 वाहिन्या बंद, 10 वाहिन्यांसाठी संपर्क क्रमांक

सोनीच्या 22 वाहिन्या बंद करून टाकण्यात आल्या आहेत तर 10 वाहिन्यांसाठी संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. यात सोनी मराठी वाहिनीचा समावेश नाही. संबंधित 10 वाहिन्या सुरू ठेवायच्या असतील तर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे.

-‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेसाठी सब टीव्ही सुरू ठेवण्यात आले आहे. ते बंद झाले तर गुजराती प्रेक्षक आवाज उठवतील.  ‘क्राइम पेट्रोल’साठी सोनी हिंदी वाहिनी सुरू ठेवण्यात आली आहे. स्पोर्टस् सुरू असल्याने त्या वाहिन्याही सुरू आहेत, पण सोनी मराठी बंद झाल्यास मराठी प्रेक्षक गप्प बसतील हे लक्षात घेऊन ही वाहिनी काढून टाकण्यात आली. परंतु हा मराठी प्रेक्षकांवर मोठा अन्याय असल्याचे भालवणकर म्हणाले.