Sonia Gandhi ढोंग, बढाया, धाकदपटशा हेच मोदी सरकारचे तत्त्वज्ञान!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

ढोंग, बढाया आणि धाकदपटशा हेच मोदी सरकारच्या राज्यकारभाराचे तत्त्वज्ञान राहिले आहे, अशा शब्दांत ‘यूपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज केंद्रातील भाजप सरकारवर तोफ डागली. त्या काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

मोदी सरकारच्या राजवटीत लोकशाही संस्था उद्ध्वस्त करण्यात आल्या, असंतोष दडपण्यात आला, विरोधकांना जेरीस आणण्यात आले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यात आली असे सांगून त्या म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षांत राज्यघटनेतील तत्त्वे, मूल्ये आणि तरतुदींना हरताळ फासण्यात आला. लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकाच्या मुळावरच घाव घालण्याचे प्रयत्न सतत झाले.

  • भाजप सरकारच्या काळात देशभरात भीती आणि संघर्षाचे वातावरण जनतेने अनुभवले. मोदी सरकारने सत्य आणि पारदर्शकता राज्यकारभारातून हद्दपार केली असा आरोपही सोनिया गांधी यांनी केला.
  • राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या तीन राज्यांत भाजपला सत्तेवरून हाकलण्यात काँग्रेसला आलेल्या यशामुळे पक्षाचे मनोबल उंचावले असून आशा पल्लवित झाल्या आहेत असे सांगून त्या म्हणाल्या की, राहुलने पक्षात नवे चैतन्य ओतले असून पक्षसंघटनेत त्याने अनुभवी, बुजुर्ग आणि उमदे तरुण नेतृत्व यांचा मिलाफ घडवला आहे.
  • या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आदी नेते उपस्थित होते.
  • लोकसभा निवडणुकीला काँग्रेस पक्ष नव्या जोमाने, आत्मविश्वासाने आणि जिंकण्याच्या जिद्दीनेच सामोरा जाणार आहे. प्रतिकूल परिस्थितीवर आम्ही सर्वशक्तिनिशी मात करणार आहोत-सोनिया गांधी, अध्यक्षा, यूपीए