विराटशिवाय आशिया चषक जिंकणे हीच संघाची खरी ताकद ठरेल! सौरभ गांगुली यांची रोहितवर स्तुतिसुमने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही वर्षांपूर्वी (2018) टीम इंडियाने विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आशिया चषक जिंकला होता. आताही रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाने पुन्हा आशिया चषक जिंकणे हीच आपल्या संघाची खरी ताकद ठरेल, असे स्पष्ट मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी व्यक्त केले आहे. रोहित एक शानदार कर्णधार आहे म्हणूनच त्याच्याकडे निवड समितीने हिंदुस्थानच्या वन डे संघाचे नेतृत्व सोपवलेय, अशी पुस्ती जोडून गांगुली यांनी रोहितवर स्तुतिसुमने उधळली.

 रोहितचे नेतृत्व टीम इंडियासाठी खरेच लाभदायी ठरले आहे. तो हिंदुस्थानी संघाला खरेच मोठे यश मिळवून देईल असा आम्हाला विश्वास आहे असे सांगून गांगुली म्हणाले, रोहितने आपल्या नेतृत्वात पाचवेळा मुंबई इंडियन्स संघाला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत त्याने आपल्या संघाला यश मिळवून दिले आहे. आता तर त्याच्यासोबत मजबूत आणि लढाऊ हिंदुस्थानी संघ आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात आपला संघ नक्कीच आशिया कप पुन्हा जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे.

 रोहितचे नेतृत्व टीम इंडियासाठी खरेच लाभदायी ठरले आहे. तो हिंदुस्थानी संघाला खरेच मोठे यश मिळवून देईल असा आम्हाला विश्वास आहे

 आम्ही विराटला कर्णधारपद सोडायला सांगितले नव्हते!

माजी हिंदुस्थानी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी स्पष्ट केले, क्रिकेट बोर्ड अथवा राष्ट्रीय निवड समितीने विराटला टी-20 संघाचे कर्णधारपद सोडायला सांगितले नव्हते, पण तो या संघाच्या कर्णधारपदावर राहायला तयारच नव्हता. मग राष्ट्रीय निवड समितीकडे त्याला वन डे संघाच्या कर्णधारपदावरून दूर करण्यावाचून तरुणोपायच नव्हता. कारण टी-20 आणि वन डे या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघांसाठी वेगवेगळे कर्णधार असावेत हे निवड समितीला मान्यच नव्हते. त्यामुळे अखेर वन डे संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्याचा निर्णय निवड समितीला घ्यावा लागला, असे गांगुली यांनी स्पष्ट केले. अखेर निवड समितीने  टीम इंडियाच्या वन डे आणि टी-20 संघांचे नेतृत्व रोहितकडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व विराटकडे ठेवण्याचा निर्णय घेतला, असे गांगुली यांनी सांगितले.