दक्षिण आफ्रिकेचे घवघवीत यश, कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्विंटॉन डी काॅकच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने मंगळवारी दुसरी कसोटी 10 गडी राखून जिंकत श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने खिशातही घातली. पहिल्या डावात 127 धावांची आणि दुसऱया डावात नाबाद 31 धावांची खेळी साकारणाऱया डीन एल्गारची ‘सामनावीर’ तसेच ‘मालिकावीर’ म्हणून निवड करण्यात आली. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 60 गुणांची कमाईही केली.

श्रीलंकेचा पहिला डाव 157 धावांमध्येच आटोपला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 302 धावांची फटकेबाजी केली. त्यानंतर श्रीलंकेने मंगळवारी 4 बाद 150 या धावसंख्येवरून दुसरा डाव पुढे खेळायला सुरुवात केली, पण श्रीलंकेला दुसऱया डावातही मोठी मजल मारता आली नाही. 211 धावांमध्येच त्यांचा डाव गडगडला. कर्णधार दिमुथ करुणारत्नेने 103 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, पण इतरांची साथ न लाभल्यामुळे श्रीलंकेला अपयशाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने 44 धावा देत 4 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. लुथो सिपामलाने 3, अॅनरीक नॉर्खियाने 2 आणि वियान मुल्डरने 1 फलंदाज बाद केला.