
दक्षिण आफ्रिकेचा तरुणी खेळाडू मॅथ्यू ब्रेट्झके याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वप्नवत पदार्पण केले आहे. वन डे क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर सलग पाच डावांमध्ये अर्धशतकीय खेळी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
इंग्लंडविरुद्ध लॉर्डस मैदानावर झालेल्या दुसऱ्या वन डे लढतीत मॅथ्यू ब्रेट्झके याने 77 चेंडूत 85 धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. मात्र अर्धशतकीय खेळीसह त्याने खास विक्रम आपल्या नावावर केला. वन डे क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर पहिल्या पाचही लढतीत अर्धशतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला. तसेच लॉर्ड्सवर सर्वाधिक धावा करणारा आफ्रिकन खेळाडूही ठरला. याआधी हर्षल गिब्सने 2008 मध्ये येथे 74 धावांची खेळी केली होती
मॅथ्यू ब्रेट्झके पहिल्या पाच वन डे लढतीमध्ये तुफानी फलंदाजी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे. पहिल्या पाच वन डे लढतीत त्याने 90.60 च्या सरासरीने 463 धावा चोपल्या आहेत. यात त्याच्या 4 अर्धशतकांचा आणि एका शतकाचा समावेश आहे. 150 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
8 बाद 330 धावा
या लढतीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून आफ्रिकेला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. एडन मार्करम आणि रयान रिकल्टन यांनी आफ्रिकेला 73 धावांची सलामी दिली. मार्करम 49 आणि रिकल्टनने 35 धावांची खेळी केली. त्यानंतर मॅथ्यू ब्रेट्झके याने 85 आणि ट्रिस्टन स्टब्सने 58 धावा करत संघाला 50 षटकात 8 बाद 330 धावांपर्यंत पोहोचले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने 4 विकेट्स घेतल्या, तर आदिल रशिदने 2 विकेट घेतल्या.
5 धावांनी विजय
आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 325 धावांपर्यंतच पोहोचू शकला आणि आफ्रिकेने 5 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. इंग्लंडकडून जो रूटने 61, जोस बटरलने 61, जेकब बेथेलने 58 धावांची खेळी करत संघाला विजयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. आफ्रिकेकडून बर्गरने सर्वाधिक 3, तर केशव महाराजने 2 विकेट्स घेतल्या. लुंगी निगडी, कॉर्बिन बॉश आणि मुथुसामीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
ODI series sealed for South Africa at Lord’s 🙌#ENGvSA 📝https://t.co/KVxAR04GDf pic.twitter.com/mHe64QyGYk
— ICC (@ICC) September 5, 2025