ज्येष्ठांसाठी शिवसेना आली धावून, लसीकरणासाठी दक्षिण मुंबईत विशेष मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना लसीकरणाचा वेग वाढला असून ज्येष्ठ नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात लसीकरणात सहभागी व्हावे यासाठी दक्षिण मुंबई शिवसेना पुढे सरसावली आहे. ज्येष्ठ नागरिकांना लसीसाठी नोंदणी कशी पूर्ण करावी यासाठी शिवसेना दक्षिण मुंबईच्या वतीने विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून याअंतर्गत दक्षिण मुंबईत सर्व शाखांमध्ये मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ परंतु अंध -अपंग नागरिकांकरिता विनामूल्य रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी जाहीर केले आहे.

राज्यात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून मोठय़ा प्रमाणात लसीकरणासाठी मुंबईकर पुढे येत आहे. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी नोंदणी कशी करावी यासाठी अनेक अडचणी येत आहेत. याची गंभीर दखल घेऊन शिवसेना दक्षिण मुंबई विभाग पुढे सरसावले असून 14 मार्चपासून दक्षिण मुंबईतील प्रत्येक शाखेत कोविड लस नोंदणी कशी करावी यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे.

त्याचप्रमाणे विभागांत जनजागृती निर्माण करण्यासाठी को विन अॅप आणि आरोग्य सेतूवरून नोंदणी कशी करावी यासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील प्रत्येक शाखेमध्ये मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याबरोबरच नजीकच्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्येदेखील मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीकरणासाठी व योग्य मार्गदर्शनासाठी जवळच्या शिवसेना शाखेमध्ये त्वरित संपर्प साधात या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, महिला विभाग संघटक जयश्री बाळ्ळीकर यांनी केले आहे.