
वरळीतील फेमस स्टुडिओसमोरील डॉ. ई. मोझेस मार्गावर असलेली 1650 मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला बुधवारी रात्री तडा गेल्याने मोठय़ा प्रमाणात पाण्याची गळती झाली. ही बाब लक्षात येताच पाणीपुरवठा विभागाकडून तत्काळ जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. मात्र कामाचे स्वरूप मोठे असल्याने आज दिवसभर दुरुस्तीचे काम सुरूच होते. या दुरुस्तीच्या कामानिमित्त 8 मे रोजी मुंबईतील ‘डी’ विभाग ग्रँट रोड, ‘ई’ विभाग भायखळा आणि ‘जी दक्षिण’ वरळी विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या भागांत ठणठणाट
‘डी’ विभागातील लॅमिंग्टन रोड, फॉकलंड रोड, पश्चिम रेल्वे, मुंबई सेंट्रल स्थानक, एम. पी. मिल्स पंपाऊंड, बी. बी. नकाशे मार्ग, ताडदेव, आंबेडकर नगर वसाहत, केशवराव खाडये मार्ग. ‘ई’ विभागातील एम. एस.अली मार्ग, बेलासीस मार्ग, कामाठीपुरा, शंकरराव पुपला मार्ग, आग्रीपाडा मार्ग, सातरस्ता जंक्शन, बी. जे. मार्ग, साने गुरुजी मार्ग, डॉ. आनंदराव नायर मार्ग, नायर रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, जगजीवन राम रुग्णालय,
व्होकार्ट रुग्णालय. ‘जी’ दक्षिण विभागातील सातरस्ता, जे. आर. बोरीचा मार्ग, धोबीघाट, जी. बी सपकाळ मार्ग, डॉ. ई. मोझेस रोड यासह आसपासच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
काही ठिकाणी कमी दाबाने पुरवठा
दरम्यान ‘डी’ विभागातील ठाकूरद्वार, एम.के. रोड, आर.आर. रोड, जे.एस.एस. रोड, खाडिलकर रोड, गिरगाव रोड, ह्यूजेस रोड, बाबुलनाथ रोड, चौपाटी रोड या भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.



























































