‘यलो मोझाईक’च्या हल्ल्यामुळे सोयाबीन संकटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱयांना आधार ठरलेले सोयाबीन पीक यावर्षी संकटात सापडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ‘यलो मोझाईक’ या विषाणूच्या हल्ल्यामुळे सोयाबीन पीक हातातून जाण्याची भीती आहे. नुकसान झालेल्या सोयाबीनचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

उसाचा हरित पट्टा म्हणून ओळख निर्माण केलेल्या राहाता, संगमनेर, राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यांतील प्रवरा परिसरातील शेतकऱयांनी यावर्षी मोठय़ा प्रमाणात सोयाबीनची लागवड केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने खरिपातील मुख्य पीक म्हणून शेतकऱयांनी सोयाबीनला पसंती दिली. महागडे बियाणे, खते आणि औषधे वापरून कधी नव्हे असे भरघोस पीक परिसरात उभे राहिले. मात्र, सततचा पाऊस आणि अनेक दिवस ढगाळ वातावरण राहिल्याने पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळू शकला नाही. परिणामी सोयाबीनवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला. मावा, तुडतुडे, चक्री भुंगेरे आणि लष्करी अळी पिकावर आली. पाऊस उघडीप देत नसल्याने फवारणी करण्यासाठी शेतात चालणे कठीण झाले. त्यातच फवारणी करून पाऊस आला तर त्याचा उपयोग किती होईल, याची अडचण झाली.

गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली; पण सोयाबीन पिकाला फुले लागल्याने औषध मारू नका म्हणून सल्ला देण्यात आला. कीटकनाशकाने फूलगळ होते म्हणून म्हणून हा सल्ला देण्यात आला. याच काळात सोयाबीनवर ‘यलो मोझाईक’ नावाच्या विषाणूने कहरच केला. पिकांची पाने पिवळी होऊन ते मुळासकट नष्ट होऊ लागली. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

‘यलो मोझाईक’ची शेतकऱयांना माहिती आणि प्रतिकार कसा करायचा यासाठी बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाने शिवार फेरीचे आयोजन केले होते. पीक संरक्षण शास्त्र्ाज्ञ भरत दवंगे, विद्या विकास शास्त्र्ाज्ञ शैलेश देशमुख, मृद विज्ञान शास्त्र्ाज्ञ शांताराम सोनवणे आणि कृषी विभागाचे अधिकारी वाकचौरे यांनी अनेक गावांत जाऊन शेतकऱयांना माहिती दिली. हसनापूर येथील समीर अब्बास पटेल यांच्या वस्तीवर सोयाबीन रोग नियंत्रणावर चर्चासत्र आयोजित करून मार्गदर्शन केले.

फुले संगम आणि पीकविमा

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या फुले संगम या सोयाबीन वाणाची बहुतांशी शेतकऱयांनी पेरणी केली आहे. हा वाण सर्वाधिक उत्पादन देणारा ठरला आहे. मात्र, याच वाणावर ‘यलो मोझाईक’चा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळून आला आहे. सोयाबीन पिकाचे सध्या मोठे नुकसान झाले असून, अनेक शेतकऱयांनी पीक विमा भरला आहे. त्यामुळे शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

असे करावे नियोजन

भरत दवंगे यांनी ‘यलो मोझाईक’ विषाणू निर्माण होण्याची कारणे, त्याचा पिकावर होणारा परिणाम, शेतकऱयांनी करावयाच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. ‘यलो मोझाईक’च्या नियंत्रणासाठी दोन आठवडय़ांत दोन औषध फवारणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पहिल्या आठवडय़ात चिलेटेड मॅगनीज, पोटॅशियम मॉलिब्डेट याची फवारणी करून आठ दिवसांनी ऑलिका किंवा प्रोक्लेम किंवा सोलोमन आणि लिब्रल यांची फवारणी करण्याचे सुचवले.